अकोलेतील निळवंडे कालव्याचे काम सुरु न झाल्यास २७ मे ला रस्ता रोको
कोपरगाव: निळवंडे कालव्याचे अकोले तालुक्यातील बंद केलेले काम उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुरु न झाल्याने दुष्काळी शेतकरी संतप्त झाले आहे. जिल्हाधिकारी व जलसंपदा विभाग यांनी २३ मे पर्यंत काम सुरु न केल्यास निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने २७ मे रोजी तळेगाव दिघे येथील चौफुलीवर सकाळी ९:०० वाजता रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी दिला आहे.
निळवंडे प्रकल्पाची पायाभरणी होऊन ४८ वर्ष संपत आली आहे. तरीही या प्रकल्पाचे कालवे अद्याप पूर्ण झाले नाही. उच्च न्यायालयात अजित काळे यांनी अकोले तालुक्यातील राजकारणाच्या कचाट्यात अडकलेले काम त्वरित सुरु करावे. आगामी महिनाभर न्यायालयास सुट्टी व पुढील पावसाळा याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या हाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या न्या. गंगापूरवाला व न्या. अरुण ढवळे यांनी अकोलेतील काम सुरु करण्यास जी काही मदत लागेल ती शासनाने त्वरित उपलब्ध करून येणारे अडथळे निवारण करून काम चालू करण्याचे आदेश दिले होते. त्याला पंधरा दिवसाचा कालावधी गेला तरी जलसंपदा विभाग थंडच दिसत आहे. काम चालू करण्यासाठी कोणतीही हालचाल सुरु झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे. आगामी रणनीती ठरविण्यासाठी काकडी ता. कोपरगाव येथील सभागृहात नुकतीच कालवा कृती समितीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक पत्रकार नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Website Title: Akole nilwande canal work is not started