बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून शेतात नेऊन अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी
Ahmednagar | Parner | पारनेर: सात वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून शेतात नेऊन अत्याचार करणारा पोपट शंकर साळवे रा. पळशी ता. पारनेर याला जिल्हा न्यायाधीशाने दोषी धरून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
पारनेर तालुक्यातील एका गावामध्ये 8 ऑक्टोबर, 2016 रोजी ही घटना घडली होती. या खटल्यात सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकिल उमेशचंद्र यादव-पाटील यांनी काम पाहिले. अॅड. सचिन पटेकर यांनी सहाय्य केले.
8 ऑक्टोबर, 2016 रोजी पोपट साळवे याने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्या आजोबांच्या शेतातच निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. सदर घटनेमुळे पारनेर तालुक्यामध्ये क्षोभ निर्माण होऊन ग्रामस्थांच्या तर्फे पारनेर बंदची हात देण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून दोषी व्यक्तीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने अॅड. यादव-पाटील यांची नेमणूक करण्यासंबंधी शासन पातळीवर पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने शासनाने अॅड. यादव-पाटील यांची या प्रकरणात नियुक्ती केली होती.
सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष, घटनास्थळ पंचनामा, घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू, त्याचप्रमाणे आरोपीच्या अंगावर आढळून आलेली घटनास्थळावरील मातीचा डाग, रक्ताचा डाग आणि इतर वस्तुस्थितीजन्य पुरावयाची भक्कम साखळी न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी पोपट साळवे याला पोक्सो कायद्याच्या कलम 10 प्रमाणे पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, त्याचप्रमाणे भारतीय दंडविधानाच्या 376 (2) व 511 प्रमाणे 10 वर्षाची सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
Web Title: Ahmednagar lure of chocolate and the perpetrator was severely punished