प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरुणीची निघृण हत्या
Breaking News | Mumbai Crime: प्रेम प्रकरणातील बदल्याच्या भावनेतूनच ही हत्या केल्याचा संशय.
नवी मुंबई: उरण नवी मुंबईतील अक्षता म्हात्रेच्या हत्येनंतर उरणमधील यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची निघृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. प्रेम प्रकरणातील बदल्याच्या भावनेतूनच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीला अटक झाल्याखेरीज मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला होता. मात्र, संध्याकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेच्या निषेधार्थ उरण बाजारपेठ दुपारी बंद होती.
उरण शहरातील एनआय हायस्कूलसमोरील प्रतीक अपार्टमेंटमध्ये यशश्री शिंदे आईवडील व धाकट्या दोन बहिणींसह राहत होती. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत ती काम करीत होती. गुरुवारी कामाला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली. याप्रकरणी नातेवाईकांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शनिवारी उरण कोटनाका पेट्रोलपंपाजवळील मैदानावर छिन्नविछिन्न अवस्थेमधील तिचा मृतदेह आढळला.
पोलिसांनी मृतदेह अतिशय विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांनाही संशय आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सात पथके तयार करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मी संकटात, मला वाचवा…
यशश्री बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता तिने एका मैत्रिणीला फोन करून मी संकटात आहे. मला कुणीतरी मदत करा, वाचवा असे सांगितले होते. याची माहिती पोलिसांना देऊनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. वेळीच कारवाई केली असती तर माझी मुलगी जिवंत असती असा गंभीर आरोप आई रेश्मा शिंदे व नातेवाइकांनी केला आहे.
Web Title: A 20-year-old girl was brutally murdered over a love affair
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study