नवऱ्याला मारले त्रिशूळ, बळी गेला निरागस पुतण्याचा; ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Breaking News | Daund: येथील घरगुती भांडणात चुलतीकडून झालेल्या हल्ल्यात ११ महिन्यांच्या पुतण्याला हकनाक जीव गमवावा लागला. (Died)
केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील घरगुती भांडणात चुलतीकडून झालेल्या हल्ल्यात ११ महिन्यांच्या पुतण्याला हकनाक जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
केडगाव-आंबेगाव पुनर्वसन येथील नितीन मेंगावडे व त्यांची पत्नी पल्लवी मेंगावडे यांच्यात भांडणे चालू होती. भांडणे सोडविण्यासाठी शेजारी राहणारी पल्लवी हिची जाऊ भाग्यश्री मेंगावडे तिच्या ११ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन तेथे आली होती. नितीन व पल्लवी पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण चालू होते.
पल्लवीला राग अनावर झाल्याने तिने घरातील देवीसमोरील त्रिशूळ घेऊन नवरा नितीन याला मारायला धावली. त्रिशुळाचा वार नितीनने चुकवला. मात्र चुकलेला त्रिशुळाचा वार भाग्यश्री हिच्या कडेवर असलेला अवधूत याच्या कपाळात घुसला.
या घटनेनंतर नातेवाइकांनी त्याला केडगाव येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यास लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे त्याने प्राण सोडला.
भाग्यश्री मेंगावडे हिला दोन मुली व अवधूत हा एकच मुलगा होता. या घटनेत काहीही दोष नसताना अवधूत याला हकनाक जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भाग्यश्री मेंगावडे यांनी फिर्याद दिली असून, पल्लवी व नितीन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
Breaking News: Husband killed with trident, innocent nephew killed 11-month-old baby dies