अहिल्यानगर ब्रेकिंग: पैसे वाटताना एकास पकडले, या नेत्याचा कर्मचारी
Breaking News | Ahmednagar Assembly Election 2024: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटताना ग्रामस्थांनी एकास पकडले.
जामखेड : तालुक्यातील नान्नज येथे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटताना ग्रामस्थांनी एकास पकडले. पकडलेला इसम हा आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लि; कंपनीच्या जय श्रीराम कारखाना हळगाव येथील कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. या इसमाकडून रोख रक्कम ४७ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. हा इसम मतदान करावे, या उद्देशाने पैसे वाटप करीत असल्याने पोलिसांनी खर्डा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खर्डा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आनंद धनवडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, जामखेड तालुक्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार फिरते सर्वेक्षण खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पथक काम करीत आहे. काल पथकाची बटेवाडी परिसरात पाहणी सुरू असताना नान्नज येथे एक जण पैसे वाटप करीत असल्याची तक्रार निवडणूक प्रशासनाकडून पथकाला प्राप्त झाली, त्यानुसार तत्काळ पथक नान्नज गावात दाखल झाले तेव्हा जवळके रोडलगत लोकांची गर्दी दिसली. ग्रामस्थांनी एका इसमाला पकडून ठेवले होते. ग्रामस्थ शहाजी गाडे, ओम मोरे, योगेश रजपुत, मंगेश काकडे, राज पवार, रघुनाथ मोहोळकर, महेंद्र मोहोळकर यांनी पकडलेला इसम हा आमदार रोहित पवार यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी या इसमाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मधुकर मारूती मोहिते (वय ५०, रा. पारेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच मोहिते हा आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी लि; यांच्या मालकीच्या जय श्रीराम साखर कारखाना हळगाव येथे काम करीत असल्याचे पोलीस चौकशीत त्याने सांगितले. या इसमाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचेकडे ४७ हजार रुपये रोख मिळून आले.
तसेच लोकांची नावे असलेल्या तीन चिठ्ठया व दोन मोकळे लिफाफे सापडले. पोलिसांनी रोकड व चिठ्ठया जप्त केल्या आहेत. पोलीस कॉ. धनवडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १७३, २२३, १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Assembly Election One was caught while distributing money
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study