‘मेलेला’ बिबट्या उठला अन् बघ्यांची बोबडी वळली
Breaking News | Nashik: व्हिडीओ शूटिंगही सुरू केले. इतक्यात बिबट्या अचानक उठला आणि साऱ्यांचीच बोबडी वळली.
पिंपळगाव बसवंत |नाशिक: महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर निपचित पडलेला बिबट्या ठार झाला असावा असे समजून रस्त्याने येजा करणारी वाहने थांबली. त्यातील काहींनी बिबट्याचा जवळ जात अंदाज घेतला. काहींनी व्हिडीओ शूटिंगही सुरू केले. इतक्यात बिबट्या अचानक उठला आणि साऱ्यांचीच बोबडी वळली. मिळेल तिकडे लोक पळू लागले; मात्र बिबट्याने झुडपातून धूम ठोकली.
निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. तेव्हा काही वाहनधारकांनी गाड्या थांबवून बिबट्या मेला असावा म्हणनू गाड्या थांबवून बिबट्याच्या जवळ जाऊ लागले. एकेक करीत वाहने थांबत राहिली आणि गर्दी वाढत गेली. परिसरातील नागरिकांचीही बिबट्याला पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी होऊ लागली. काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये बिबट्याचा व्हिडीओ करत गोंधळ सुरू केला. गोंगाट वाढत असतानाच काही वेळापूर्वी निपचित पडलेला बिबट्या अचानक खाडकन उठून उभा राहिला तेव्हा उपस्थितांची मोठी तारांबळ उडाली. जीव मुठीत घेऊन लोक मिळेल त्या दिशेने पळू लागले. मात्र घाबरलेल्या बिबट्याने जखमी अवस्थेतच रस्त्याच्या कडेला अंधारात धूम ठोकली.
Web Title: ‘dead’ leopard got up and the onlookers turned around
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study