अहमदनगर: जिल्ह्यातील या सात जागांवर काँग्रेसचा दावा
Breaking News | Vidhan Sabha Election: नगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत, यासाठी प्रदेश समितीकडे आग्रह.
अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने नुकतीच मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत, यासाठी प्रदेश समितीकडे आग्रह धरण्यात आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस समितीने आतापासून काँग्रेसला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रिय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आ. नाना पाटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह नेते उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्याचा आढावा जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी तर नगर शहराचा आढावा महानगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सादर केला. तसेच नगर लोकसभा निवडणुकीतील अनुभव व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने नगर शहरासह जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती प्रदेश काँग्रेस समितीला देण्यात आली. यावेळी सात मतदारसंघावर दावा करण्यात आला. यातील संगमनेर, श्रीरामपूर याठिकाणी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय राहाता, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोला हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नगर दक्षिण जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा लढली नव्हती. आता राज्यात महाविकास आघाडी असून शिवसेनेने श्रीगोंद्यावर दावा केला आहे. नगरमध्ये काँग्रेसची तयारी सुरू आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर शहराची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे.
राष्ट्रवादीने त्यासाठी लोकसभेला काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली पाहिजे, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नगर जिल्ह्यात काँग्रेस बळकट आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि मतदारांचा महत्त्वाचा वाटा आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा खासदारकीला एकही उमेदवार नसला तरी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार करण्यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. ज्येष्ठ नेते आ. थोरात यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो. त्यामुळे नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असल्याचे वाघ आणि काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचा मुख्यमंत्री:
बैठकीत माजी मंत्री आ. थोरात म्हणाले, महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकर्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो.
Web Title: Congress claims these seven seats in Ahmednagar vidhan sabha Election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study