संपत्तीत नाही मिळाला वाटा, सुनेने काढला सासऱ्याचा काटा
Breaking News | Nagpur Crime: संपत्ती मुलगी आणि नातवाच्या नावाने करणार असल्याची कुणकुण सुनेला लागताच तिने सुपारी देऊन सासरेबुवांना संपविल्याची खळबळजनक घटना
- हायप्रोफाईल घटनेने नागपूर हादरले
- तिसरा आरोपी फरारी; शोध जारी
- आधी वाटले अपघात; मग समोर आला घातपात
नागपूर : सासरा त्याची सुमारे तीनशे कोटींची संपत्ती मुलगी आणि नातवाच्या नावाने करणार असल्याची कुणकुण सुनेला लागताच तिने सुपारी देऊन सासरेबुवांना संपविल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. नगररचना विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना पुट्टेवार (५३) यांना याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना याकामी मदत केल्याचा आरोप असलेल्या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी घटनेनंतर फरारी झाला आहे.
पुरुषोत्तम पुट्टेवार (८०) असे मृताचे नाव आहे. ते आपली संपत्ती मुलगी व नातवाच्या नावे करणार असल्याचा सुगावा सून अर्चना यांना लागला होता. मुलगा डॉक्टर, सून अधिकारी असे हे सुखवस्तू कुटुंब आहे. तरीही सुनेला पैशाचा मोह आवरता आला नाही. तिने पुरुषोत्तम यांना ठार मारण्याची सुपारी देऊन हिट अँड रनचा प्रकार घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस आरोपींकडून अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
नीरज निमजे (३०) आणि सचिन धार्मिक (२९) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. पुरुषोत्तम यांचे चिरंजीव प्रख्यात डॉक्टर असून त्यांचा ड्रायव्हर सार्थक बगाडे याचाही यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तो सध्या फरारी झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. मोबाईल तपासातून बिंग फुटले
निमजे आणि धार्मिक या दोघांच्या मोबाईलचे सीडीआर तपासले असता या खुनाला वाचा फुटली. अर्चना ही घटनेच्या दिवशी दोघांच्याही संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी अर्चनाचे नाव सांगितल्याने पोलिसांनी तिला अटक केली. अर्चनाने किती रुपयांची सुपारी दिली होती, हे सखोल चौकशीत स्पष्ट होणार आहे.
पुरुषोत्तम २२ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बालाजीनगर येथे आपल्या कन्येच्या घरी चालत निघाले असता सचिन हा दुचाकीने पुरुषोत्तम यांचा पाठलाग करीत होता. त्याने याची माहिती नीरज आणि सार्थक यांना दिली. त्यानंतर नीरजने भरधाव कार पुरुषोत्तम यांच्या अंगावरून नेली. या घटनेनंतर तिघेही पसार झाले. सुरुवातीला हे अपघाताचे प्रकरण असल्याचा बनाव या तिघांनी रचला होता. त्यानुसार पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा हे प्रकरण हिट अँड रनचे असल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली.
नातेवाईकांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गुन्हे शाखेच्या चौकशीत हा सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचे समोर आले. या घातपातासाठी एक कारही एका दुकानातून सार्थक, सचिन व नीरजने घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
Web Title: Didn’t get a share in the wealth, daughter-in-law pulled out father-in-law’s thorn
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study