अहमदनगर: मुलाला फाशी देत आईने घेतला गळफास, बीएसएफ जवान पतीवर गुन्हा
Breaking News | Ahmednagar: बीएसएफमध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने दहा वर्षांच्या मुलाला फाशी देत, स्वतःही गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर: बीएसएफमध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने दहा वर्षांच्या मुलाला फाशी देत, स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी जामखेड रस्त्यावरील लष्करी वसाहतीत उघडकीस आली. या प्रकरणी लष्करी जवान पतीवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणी बाळकृष्ण तिकोने (वय ३०) व स्वराज बाळकृष्ण तिकोने (वय १०) अशी दोघा मयतांची नावे आहेत. तिकोने कुटुंबिय मूळचे पारनेर तालुक्यातील वेसदरे येथील रहिवासी असून, ते सध्या भिंगारच्या लष्करी हद्दीत जामखेड रस्त्यावरील दमानिया बंगल्याच्या समोर राहत होते. बाळकृष्ण तिकोने हे सध्या बीएसएफ मध्ये कार्यरत आहेत. ते शुक्रवारी दुपारी सुट्टीवर घरी आले. मात्र, बराच वेळ घराचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आई-वडील व नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. ते आल्यावर त्यांनीही अनेक वेळा आवाज दिला. मात्र, दरवाजा न उघडल्याने बाळकृष्ण तिकोने हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी आपली पत्नी दरवाजा उघडत नसल्याचे सांगून पोलिसांना बरोबर नेले. पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर, त्यांना राणी तिकोने व स्वराज या दोघांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी पंचनामा करत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. दरम्यान, शनिवारी (दि.३०) मयत राणी हिच्या माहेरकडील नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळकृष्ण तिकोने याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण तिकोने हा मयत राणी हिचा कायमच छळ करत होता. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Mother hanged herself while hanging her son, crime against BSF jawan husband
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study