मला गोळ्या घातल्या जातील छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

    Maratha Reservation:  भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा तसा अहवाल आहे.

    Chhagan Bhujbal's sensational claim that I will be shot

    नागपूर: येत्या २४ डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फॉर्महाऊस ज्यांना कोणाला पाहायचे आहे त्यांनी नावे कळवा, अशी पत्रके काही जण वाटत आहेत. याचा अर्थ माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागरनंतर आता माझ्यावरही हल्ला होणार आहे. सकाळी उठलो तर सुरक्षा वाढवलेली दिसली. सुरक्षा का वाढवली याची चौकशी केली असता पोलीस म्हणाले, ‘वरून’ इनपूट आलेले आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा तसा अहवाल आहे, असा धक्कादायक दावा ओबीसी नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

    मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी जी सर्वपक्षीय व त्यांच्या नेत्यांची भूमिका आहे तशीच माझी भूमिका आहे. सारथीप्रमाणे महाज्योतीसह इतर मागासवर्गीय संस्थांना समान निधी द्यावा. ओबीसी समाजाचा सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरून काढण्यात यावा, यासह विविध मागण्या मांडत मराठा आरक्षणावरील नियम २९३ च्या प्रस्तावावर चर्चा करताना मंत्री भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत आपली भूमिका मांडली.

    भुजबळ म्हणाले, सध्या भुजबळ हे मराठ्यांचे विरोधक आहेत, अशी प्रतिमा निर्माण केली जात आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी सर्वच पक्षांची मागणी आहे. तीच मागणी आपण मांडत असताना केवळ आपल्यालाच विरोध का केला जातोय. राज्यात अशांततेचे वातावरण आहे, ते आम्ही केले का? असा सवाल करत भुजबळ पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही तर झुंडशाहीला आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना गलिच्छ भाषेत फोनवरून, सोशल मीडियातून शिव्या, धमक्या दिल्या जाताहेत. या धमक्यांचा कोणी निषेध तरी करणार आहे की नाही? अशी खंत भुजबळांनी सभागृहात व्यक्त केली.

    पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर

    काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ हे समाजा-समाजात तेढ निर्माण करताहेत असा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, माजी मुख्यमंत्री चव्हाण हे जरांगेंची भेट घेऊन त्यांना का सांगत नाही की, ओबीसी आरक्षणातून वाटा मागणे चूक आहे, जाळपोळ करणे चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणे चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गावबंदी करणे चूक आहे, एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद जाहीर करून इतर सर्व लोकांना वेठीस धरणे चूक आहे, अमुक अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या, अशी मागणी करून शासनाला धमकी देणे चूक आहे, सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याच्या प्रक्रियेला फाटा मारून ओबीसींच्या ताटातील आरक्षण मागणे चूक आहे.

    Web Title: Chhagan Bhujbal’s sensational claim that I will be shot

    See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here