राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासामोरच अपघाती मृत्यू, काळजाला पिळवटून टाकणारी घटना
पुण्यातून काळजाला पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासामोरच अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे.
पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून भाऊ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. वैशाली नितीन शेंडगे (वय- २८, रा. नायगाव, ता. पुरंदर) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.
वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहीण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून दौंड येथील बोरीभडक या ठिकाणी बुधवारी निघाल्या होत्या. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत वैशाली शेंडगे या रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तात्काळ उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बंधू विलास कोपनर यांनाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक मोहन रावसाहेब डोंबे रा. खोर डाम्बेवाडी ता. दौंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास यवत पोलीस करीत आहे.
Web Title: Accident death of sister who came to tie rakhi in front of her brother
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App