नाशिक-पुणे महामार्गावर तलवारीने भोकसून हत्या, काही तासांतच खुनाचा उलगडा
Sinnar Crime: नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरकडे येणा-या रोडवर अन्नपूर्णा हॉटेलजवळ झालेल्या खुनाचा (Murder) उलगडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत केला असून वडिलांच्या गायब होण्यामागे संबंधित मयत तांबे यांचा हात असल्याचा राग मनात धरून संशयिताने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सिन्नर: तालुक्यातील गोंदे येथील 22 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरुन गावातील एक 32 वर्षीय तरुणाला पाठलाग करुन तलवारीने भोकसून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिन्नर पोलिसांनी संशयिताचा शोध लावत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
बुधवारी (दि.1) नाशिक- पुणे महामार्गावर धोंडवीरनगर शिवारात संपत रामनाथ तांबे (32) रा. गोंदे यास अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने अंगावर वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली.
यातील मयत संपत याच्याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, तो धोंडवीरनगर शिवार येथे आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचा इतिहास तपासला असता त्याच्यावर गतवर्षी वावी पोलीस ठाण्यात चांगदेव सुखदेव तांबे (45) रा. गोंदे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यामुळे चांगदेव यांचा मुलगा प्रविण चांगदेव तांबे (22) व मयत संपत तांबे यांच्यात वडीलांचे अपहरण केल्याच्या कारणावरून जूना वाद होता. त्यामूळे प्रविणवरील पोलीसांचा संशय बळावला. अधिक माहीती घेतली असता प्रविण हा तळेगाव दाभाडे, पुणे येथे कामास असल्याची व घटनेच्या दिवशी तो गोंदे परिसरात असल्याची माहीती मिळाली.
संशयीताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यातील पुणे येथे तपासकामी गेलेल्या पोलीस पथकास प्रविण हा मिळून आला. त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता यातील मयत संपत तांबे याने आरोपी प्रविण तांबे याचे वडिलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने बुधवारी (दि. 1) सायंकाळच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणाऱ्या रोडवर मोटरसायकलने संपतचा पाठलाग केला व त्यास अन्नपूर्णा हॉटेलजवळ एकटा गाठून त्याचेकडील धारदार तलवारीने संपत याचे मानेवर, पोटावर, हातावर सपासप वार करून जीवे ठार मारले असल्याबाबत कबूली दिली.
यातील संशयितास सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक शसंतोष मुटकूळे हे करत आहेत. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक उमाप यांनी याबाबत माहिती दिली. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि सागर शिंपी, पोहवा नवनाथ सानप, पोना प्रितम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोना भुषण रानडे, तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे, पोना चेतन मोरे, शहाजी शिंदे, पंकज देवकाते, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अंकुश दराडे, गौरव सानप यांचा सहभाग होता. सिन्नर पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक उमाप यांनी तपास पथकास 15 हजारांचे बक्षीस जाहीर करत कौतुक केले.
Web Title: Murder by sword stabbing on Nashik-Pune highway
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App