अकोले तालुक्यात महिलेचा वीजवाहक तारांमुळे शॉक लागून मृत्यू, नागरिक संतप्त
Akole electrick Shock death: शेळीपालन महिलेचा वीजवाहक तारांमुळे शॉक लागून जागेवरच मृत्यू, विजेच्या तारा वेळीच आजूबाजूच्या झाडाच्या फांद्यांपासून दूर न केल्याने ही दुर्दैवी घटना.
अकोले: विजेच्या तारांमधून वाहणाऱ्या वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने तालुक्यातील कातळापुर येथील शेळीपालन करणाऱ्या बुधाबाई देवराम गावंडे या महिलेचा आज दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी जागेवरच मृत्यू झाला आहे. उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करणाऱ्या या श्रमिक महिलेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अत्यंत दुःखाची व वीज वितरण कंपनीच्या बाबत अत्यंत संतापाची भावना आहे.
विजेच्या तारा वेळीच आजूबाजूच्या झाडाच्या फांद्यांपासून दूर न केल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यात वीज महामंडळाचे वाहक पोल अत्यंत चुकीच्या पद्धतीने शेतामधून तसेच रस्त्याच्या कडेने झाडांच्या फांद्यामधून उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे दैनंदिन काम करत असताना शेतकरी व श्रमिक कुटुंबामध्ये अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत.
वीज वितरण कंपनीने तातडीने या महिलेच्या वारसांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे, वीज वितरण कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तालुक्यात अशा प्रकारे धोकाग्रस्त असणाऱ्या वीज तारा झाड व शेत पिकांपासून सुरक्षित अंतरावर उभ्या कराव्यात. शेतांमधून वाहक तारकांना पडलेले झोळ तातडीने दुरुस्त करावेत व कमकुवत झाल्याने कधीही तुटू शकतील अशा तारा तातडीने बदलून द्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, ज्ञानेश्वर काकड, एकनाथ गि-हे, भीमा मुठे यांनी केली आहे.
Web Title: woman died of shock due to electric wires
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App