पन्नास हजार रुपयांसाठी अपहरण, तीन जणांवर गुन्हा, एकास अटक
Ahmednagar | Jamkhed News: ५० हजार रुपये न दिल्यास पिस्तूलने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार.
जामखेड : ‘माझ्याकडे काय बघतो असे म्हणत एका युवकास चाकूचा धाक दाखवून मोटारसायकलवर बळजबरीने बसविले. ५० हजार रुपये न दिल्यास पिस्तूलने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याबाबतची फिर्याद एका युवकाने शनिवारी (दि. १३) सकाळी जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून पोलिसांनी तीनजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. १४) एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
कृष्णा राम खोटे (वय २२, रा. मोरे वस्ती, जामखेड) याने याबाबत फिर्याद दिली आहे. नितीन रोहिदास डोकडे, अक्षय विजय खोटे, कुणाल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी नितीन डोकडे ऊर्फ बिल्ला यास पोलिसांनी रविवारी अटक केली.
कृष्णा खोटे हा युवक शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी पाच वाजता शहरातील मोरे वस्ती येथे घरी चालला होता. नितीन रोहिदास डोकडे ऊर्फ बिल्ला व त्याचा मित्र अक्षय विजय धोत्रे दोघे (रा. मिलिंदनगर, जामखेड) हे दोघे दुचाकीवरून आले. माझ्याकडे का बघतोस, असे म्हणत चाकूचा धाक दाखवून त्या दोघांनी खोटे यास बळजबरीने दुचाकीवर बसविले. बैलबाजार येथे घेऊन गेले. तेथे गेल्यावर नितीन डोकडे याने खोटे यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय धोत्रे तेथून निघून गेला. त्यानंतर नितीन डोकडे याचा दुसरा मित्र कुणाल पवार हा तिथे दुचाकीवरून आला. तेथून दोघांनी पुन्हा बळजबरीने खोटे यास बसवून जांबवाडी येथील तलावावर घेऊन गेले. ५० हजार रुपये मागवून घे, नाही तर पिस्तूलने उडवून टाकू, असे खोटे यास धमकावले. आता घरी चला, तेथे देतो, असे म्हणत खोटे याने त्यांना घरी आणले. तेथे पैसे देण्यास उशीर झाल्याने शिवीगाळ करून पैसे नाही दिले तर ठार मारण्याची धमकी दिली. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर नितीन डोकडे व कुणाल पवार पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Kidnapping for Rs 50,000, three persons charged, one arrested