महाराष्ट्र हादरला! मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामुहिक बलात्कार
Bhandara Gang Rape: एकाच महिलेवर दोन जिल्ह्यात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना.
भंडारा: भंडारा जिल्ह्यात कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हाळमोह परिसरात मदतीचा बहाणा करून शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू असून, गोंदिया पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर भंडाऱ्यात तळ ठोकला. आरोपींचे जबाब नोंदवून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेतअमानुष पद्धतीने अत्याचार केल्यामुळे महिलेची प्रकृती बिकट आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अत्याचार पीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. ३० जुलै रोजी घरगुती वादातून ती घराबाहेर पडली. माहेरी जाण्यासाठी निघाली असता वाटेत श्रीराम उरकुडे (वय ४५, रा. गोरेगाव) हा मिळाला. त्याने तिला गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार येथे नेऊन अत्याचार (Sexually abused) केला. नंतरही ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले. ती भटकत असताना १ ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तेव्हा एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी नेऊन देतो,’ असे म्हणाला. पण, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. पण, दोघांनीही तिला शेतात नेऊन अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला. २ ऑगस्ट रोजी सकाळी सदर महिला विवस्त्र अवस्थेत शेतात आढळली.
कारधा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. चौकशीअंती महिलेवर गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि पळसगाव मार्गावर एकाने आणि भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह परिसरात दोघांनी अत्याचार केल्याचे पुढे आले. कारधा आणि लाखनी पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध चमू बनवून आरोपींचा शोध घेतला. नंतर दोघांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील पहिली अत्याचाराची घटना गोंदिया जिल्ह्यातील हद्दीत घडल्याने कारधा पोलिसांनी गुन्हा नोंदवून सदर प्रकरण गोंदिया जिल्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. बलात्कार (Rape) झालेल्या विवाहितेवर सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Title: Gang rape of a woman on the pretext of help