रेशनिंगचा माल घेऊन जाणाऱ्या चार ट्रक चालकांवर गुन्हा दाखल
अकोले | Crime: अकोले तालुक्यातून कोल्हार घोटी मार्गे भंडारदराच्या दिशेने चार ट्रक रेशनिंगचा माल घेऊन जात असताना राजूर पोलीस ठाण्यासमोर पोलीस उपाधीक्षक नितीन खैरनार, हवालदार विजय फटांगरे, अशोक गाडे, डी.के. भडकवाड यांनी चारही ट्रक संशयास्पद असल्याचा अंदाज घेत ही वाहने ताब्यात घेतली.
या ट्रकमध्ये आलेल्या रेशनिंग मालाच्या पावत्यांवर चालकाचे नाव, गाडी क्रमान, गोदामपालाची सही, दिनांक आढळून आले नाही. या ट्रक संशयास्पद असल्याचा अंदाज घेत सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी ही वाहने ताब्यात घेऊन चौकशी केली.
गुरुवारी सायंकाळी पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन याबाबत माहिती घेतली. पोलीस हवालदार विजय फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हौशीराम दिनकर देशमुख, साई संदेश धुमाळ, योगेश राजेंद्र धुमाळ, अशोक हिरामण देशमुख या चार जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
गहू, तांदूळ आणि वाहनासह एकूण ५६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन खैरनार हे करत आहे.
Web Title: Four truck drivers carrying ration goods crime filed