शेतीचे बनावट सातबारा, खोटे दस्तावेज बनवून आयडीबीआय बँकेला २६ लाखांचा गंडा
Shrigonda News: श्रीगोंदा शहरातील आयडीबी आय बँकेकडून २५ लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक (Fraud).
श्रीगोंदा: शेतीचे बनावट सातबारा, उतारे, फेरफार तसेच खोटे दस्तावेज बनवून श्रीगोंदा शहरातील आयडीबी आय बँकेकडून २५ लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येथील सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बँकेचे व्यवस्थापक अजय पोपट दानवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत रा. पीसोरे बुद्रुक यांना अटक केली आहे.
श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येथील अंकुश जालिंदर वैद्य यांनी 4 लाख 60 हजार रुपये, जालिंदर खंडू वैद्य 2 लाख रुपये, वैभव दादा थोरात 3 लाख रुपये, सोपान दादा राऊत 3 लाख रुपये, चंद्रकला शिवाजी राऊत 4 लाख 95 हजार रुपये, महेश सोपान राऊत 3 लाख 11 हजार रुपये, मीना सोपान राऊत 4 लाख 95 हजार रुपये असे एकूण 25 लाख 61 हजार रुपये पीक कर्ज सन 2017 ते 2018 या कालावधीमध्ये घेतले होते.
या पीक कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने हे पीक कर्ज थकीत होते. बँकेचे शाखाधिकारी अजय दानवे यांनी डिसेंबर 2021 मध्ये थकीत कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना त्यांना या कागदपत्रात शेतीचे खोटे सातबारा उतारे, फेरफार तसेच खोटे दस्त दिल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेचे वकील सुभाष संभाजी बोरुडे यांच्या मार्फत पीक कर्ज तसेच त्यावरील व्याज भरण्यासाठी 21 मार्च 2022 रोजी अधिकृत नोटीस पाठविली.
या नोटीस ला कोणतेही उत्तर न मिळाल्याने शाखाधिकारी दानवे हे आपल्या सहकार्यांसह पीक कर्जाच्या वसुली साठी संबंधितांकडे गेले असता त्यांनी कर्ज भरण्यास नकार दिला. यामुळे 7 जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत या दोन जणांना पोलिसांनी अटक केले असून इतर 5 जण फरार झाले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.
Web Title: 26 lakhs to IDBI Bank by making Fraud Satbara of agriculture, fake documents