धक्कादायक! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून धावत्या एक्सप्रेसमध्ये अत्याचार
Breaking News | Thane Crime: 16 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीचं कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण करत तिच्यावर धावत्या एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर, आरोपीला अटक.
ठाणे: 16 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीचं कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण करत तिच्यावर धावत्या एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नराधमाचा शोध घेऊन त्याला अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावात सापळा रचून अटक केलीय. गजानन शिवदास चव्हाण (वय 30 ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण परिसरात राहत आहे. तर नराधम आरोपी हा मूळचा अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावाचा रहिवासी असून, तो कामानिमित्तानं टिटवाळा इथं राहणाऱ्या भावाकडे राहत होता, त्यातच 29 जून रोजी पीडित अल्पवयीन मुलीची कल्याण रेल्वे स्थानकात भेट झाली, त्यानंतर तिचे अपहरण करत लोकलने टिटवाळा इथं भावाच्या घरी घेऊन गेला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी टिटवाळा ते कसारा लोकलने प्रवास करीत कसारा रेल्वे स्थानकातून अकोल्याकडे जाणारी एक्सप्रेसमध्ये बसून प्रवास करीत होता. या प्रवासादरम्यान पीडित मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केला, शिवाय तिला नराधमाने आपल्या मूळ गावी बसमध्ये नेत तिच्यावर अत्याचार करत पीडित मुलीला अकोला रेल्वे स्थानकात सोडून पळून गेला होता.
दरम्यान, अकोला लोहमार्ग पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला, त्यानंतर अकोला रेल्वे पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधम गजाननवर भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) 64, 74 तसेच पोक्सो कायद्याचे कलम 4 आणि 8 प्रमाणे गुन्हा दाखल करून हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केलाय. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या पथकानं तपास सुरू केला. तपासादरम्यान नराधम पीडित मुलीला कल्याण स्थानकातून घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं.
त्यानंतर रेल्वे पोलीस पथकानं त्याची ओळख पटवून त्याच्या मागावर पोलीस असतानाच तो मूळगाव असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक पातूर पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून त्याला अटक केली, यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीला त्याच्या मुळगावातून 10 जुलै रोजी अटक करून 11 जुलै रोजी कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केलं असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहितीही त्यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
Breaking News: 16-year-old minor girl kidnapped and abused in a running express