गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; पुन्हा नाराजी तर नाही ना?
Visit to Guwahati: सत्तेत आल्यानंतर ४० दिवस मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी कारभार पाहिला त्यानंतर ९ आमदारांनाच संधी मिळाली.
मुंबई: मुंबई ते गुवाहाटी या शिंदे गटाच्या गाजलेल्या दौऱ्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले आणि मुख्यमंत्री झाले. आता एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदार आणि समर्थक खासदार पुन्हा कामाख्या देवीला जाणार हे निश्चित झाले होते. सर्वानुमते ठरल्यानुसार २६ नोव्हेंबरला कामाख्या देवीचे दर्शन झालेही, मात्र या दौऱ्यातून चार मंत्री, चार आमदार आणि तीन खासदार यांनी काढता पाय घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटात पुन्हा नाराजी तर नाही ना, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला. नंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात ९ आमदारांनाच संधी मिळाली होती. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी पसरली होती, आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमदारांतील नाराजीची चर्चा सुरू असताना गुवाहाटी दौरा ठरला. २१ नोव्हेंबर तारीख ठरली, पण ऐनवेळी रद्द झाली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन तारीख जाहीर होईल, असे जाहीर केले. पण जेव्हा २६, २७ नोव्हेंबर ही तारीख ठरली तेव्हा प्रत्यक्षात गुलाबराव पाटीलच या दौऱ्यात सामील झाले नाहीत.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे अनुपस्थित राहिले. सत्तारांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंतांनी आरोग्य शिबिर, गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक, शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण दिले. त्याचप्रमाणे आमदार महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर, संजय गायकवाड, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे यांनीही अनुपस्थितीचे वैयक्तिक कारण दिले.मंत्रिपदावरून ज्यांच्या नाराजीची सर्वाधिक चर्चा रंगली ते बच्चू कडू मात्र या दौऱ्यात सहभागी झाले.
Web Title: 11 people not visit to Guwahati
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App