अहमदनगर: पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Breaking News | Ahmednagar: मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
अहमदनगर: मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२३) दुपारी केडगाव जवळील सोनेवाडी (ता. नगर) शिवारात असलेल्या तळ्यात घडली.
प्रेम कैलास बगळे (वय १६, रा. वैष्णवनगर, केडगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत बगळे हा इयत्ता १० वीची परीक्षा देत होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो व त्याच्या वर्गातील आणखी दोघे, असे तीन जण सोनेवाडी गावच्या शिवारात अकोळनेर रस्त्यावर असलेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास तिघे जण तळ्यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्यातील दोघांना पोहता येत असल्याने ते बाहेर आले. मात्र, प्रेम बगळे याला चांगले पोहता येत नसल्याने, तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
हे पाहून त्याचे दोन्ही मित्र घाबरले व त्यांनी आरडाओरडा सुरु केला. तो ऐकून आसपास असणारे नागरिक तेथे जमा झाले. मात्र, नागरिक तेथे येईपर्यंत तो पाण्यात बुडाला होता. तलावात पाणी जास्त असल्याने आणि मागील
वर्षी या तलावातील गाळ व माती ग्रामस्थांनी काढलेली असल्याने तलावात मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कोणी पाण्यात उतरण्यास धजावले नाही.
महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोन करून माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक काळे, संजय शेलार, सूरज कार्ले, शिवाजी कदम, सागर जाधव, विशाल नवगिरे, संदेश शेलार आदींचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या पथकातील जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने पाण्यात उड्या घेत बुडालेल्या प्रेम बगळे याचा शोध घेतला. थोड्या वेळात त्याचा मृतदेह या पथकाला पाण्यात तळाशी सापडला. तो या पथकाने बाहेर काढला. ही शोध मोहीम सुरु असताना तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
नगर तालुका पोलिस ठाण्यातील अंमलदार रायचंद पालवे हेही घटनास्थळी गेले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून प्रेम बगळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. मयत प्रेम बगळे हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे.
Web Title: Youth who went swimming drowned in water
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study