दीडशे फूट खोल दरीत युवकास ढकलले, खुनाचा गुन्हा दाखल
Nandurbar Crime: मद्य प्राशन करुन घराजवळ आरडाओरड करीत असल्याच्या रागातून सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना.
नंदुरबार: मद्य प्राशन करुन घराजवळ आरडाओरड करीत असल्याच्या रागातून सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील वलवाल गाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील वलवालचा रिचबारीपाडा येथील अमरसिंग डेका पावरा (वय २८) हा शनिवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मद्य प्राशन करुन संशयित नटवर ओजाऱ्या पावरा (वय ४३) याच्या घराजवळ आरडाओरड करीत होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात संशयित नटवर पावरा याने अमरसिंग पावरा यास घराजवळच असलेल्या सुमारे दीडशे फूट खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर अमरसिंग बराच वेळानंतरही घरी दिसून न आल्याने कुटूंबियांसह ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी अमरसिंग याचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनेबाबत धडगाव पोलिसांना माहिती दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
दरम्यान, अमरसिंग यास नटवर पावरा याने खोल दरीत ढकलून दिल्याच्या संशयावरुन डेका मोलजी पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलीस ठाण्यात संशयित नटवर पावरा याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी नटवर पावरा यास अटक केली असून त्याला मंगळवारी (दि. १७) धडगाव न्यायालयात हजर केलेय यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे.
Web Title: youth was pushed into a 150 feet deep valley, a case of murder
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App