Home अहिल्यानगर अहिल्यानगर: व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्याने बदनामी, तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर: व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्याने बदनामी, तरुणाची आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar Crime: मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्यामुळे त्याची बदनामी झाली, या भावनेतून अनिकेत सोमनाथ वडितके या 17 वर्षांच्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.

Youth commits suicide after being defamed after posting video on Instagram

लोणी: कत्तल खाण्यासाठी गाय घेऊन चालल्याच्या संशयावरून काही स्वयंघोषित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गळनिंब येथील टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याचा मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्यामुळे त्याची बदनामी झाली, या भावनेतून अनिकेत सोमनाथ वडितके या 17 वर्षांच्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल लोणी पोलिसांनी कोल्हार येथील चौघांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत मयत अनिकेतचा भाऊ अमोल मोहन वडितके यांनी लोणी पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे, अनिकेत 27 तारखेला गुहा येथून गाय घेऊन कोल्हार मार्गे चालत असताना दुपारी कोल्हार येथील काही तरुणांनी स्वतःला बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून टेम्पो अडविला आणि तू ही गाय कत्तलखान्याला घेऊन चाललास असे म्हणत त्याला टेम्पोतून ओढून बेदम मारहाण केली. तसेच त्या मारहाणीचा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामवर टाकला. गोरक्षकांनी त्यानंतर पोलिसांना कॉल करून हा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी मात्र त्यास समज देऊन सोडून दिले.

अनिकेत घरी आला आणि त्याला आपला मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्याचे समजले. त्यामुळे तो झालेली बदनामी सहन करू शकला नाही. त्याने गळनिंब, ता. श्रीरामपूर येथील राहत्या घरातच 28 तारखेला सकाळी अकरा वाजण्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा मोठा भाऊ चैतन्य घरी आला असता त्याला अनिकेत घरातच फासावर लटकलेला दिसला. त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍याने त्यास मृत घोषित केले. त्यानंतर सर्व नातेवाईक लोणी पोलीस स्टेशनला गेले आणि संबंधित आत्महत्या करण्यास जबाबदार असणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी म्हटले की, मृतदेहाची उत्तरीय तपासणी न केल्यास मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही.

रात्री शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती लोणी पोलिस ठाण्यात पोहोचले. अखेर रात्री बारा वाजल्यानंतर कोल्हार ता. राहाता येथील दिनेश राके, प्रशांत राके, संकेत खर्डे आणि सौरभ लहामगे यांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बीएनएस 2023 चे कलम 107, 351 (2) सह ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट कायदा कलम 74 प्रमाणे गुन्हा दाखल केला. चार कार्यकर्ते आणि इतर दोन अशा सहा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद उत्तर नगर जिल्हा यांच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात म्हटले आहे, दिनेश किशोर राके यांनी वैयक्तिक वादातून संघटनेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर केल्याचे समजले असून त्याला बजरंग दलाच्या पदातून निलंबित करण्यात आले आहे. पत्राच्या प्रती बजरंग दल प्रांत संयोजक, बजरंग दल जिल्हा संयोजक, जिल्हा गोरक्ष प्रमुख, बजरंग दल प्रखंड संयोजक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक लोणी व राहाता यांना दिल्या आहेत. या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब केल्याने संतप्त नातेवाईक व गळनिंब येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Breaking News: Youth commits suicide after being defamed after posting video on Instagram

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here