Accident, संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Accident | संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर कऱ्हे घाटात अज्ञात वाहनाने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. देवचंद आप्पासाहेब घुले असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मालपाणी उद्योग समुहात सुरक्षा विभागात कार्यरत होता.
मालदाड रोड परिसरातील देवचंद घुले याची सायखिंडी शिवारात शेतजमीन असून गुरुवारी रात्री तो शेतात गेला होता. तेथून काल पहाटे अडीचच्या सुमारास तो परतत असताना कऱ्हे घाटात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली. यावेळी तो दुचाकीवरुन उडून पडल्याने गंभीर जखमी झाला. धडक देणारे वाहन न थांबता निघून गेले. पहाटेची वेळ असल्याने त्याला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही.
नाशिकहन पुण्याकडे जाणाऱ्या एका वाहनचालकाने १०८ क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी आल्यानंतर त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसांना माहिती कळविल्यानंतर त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून तो मालपाणी उद्योग समुहाच्या सुरक्षा विभागात सेवेत असल्याचे समोर आले.
याबाबत घुले यांचे मेहुणे सचिन वाकचौरे (रा. कळस) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. पारधी अधिक तपास करीत आहेत.
कळस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित भाऊ व तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.
Web Title: Young man killed in unidentified vehicle Accident