भावाला फोन, मित्रांना मेसेज, खिशात चिठ्ठी ठेवून तरुणाने जीव दिला; पाहताच भावाने हंबरडा फोडला
Breaking News | Jalgaon Suicide: झाडाला दोरी बांधत गळफास घेतल्याची घटना.
जळगाव: शेतजमिनीवरून काका- पुतण्यामध्ये वाद सुरु होता. या वादात काकाकडून होणारा त्रास असह्य झाल्याने पुतण्याने जीवनयात्रा संपवली आहे. आयुष्याची अखेर करण्यापूर्वी या तरुणाने एक चिट्ठी लिहून ती व्हॉट्सअप ग्रूपवर शेअर केली. त्यानंतर झाडाला दोरी बांधत गळफास घेतल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथील चरणसिंग जाधव (वय 42) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मृत चरणसिंगचे भाऊ चेतन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या जामदा शिवारात असलेल्या शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका आणि त्यांची मुलं यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. या वादातून चरणसिंग याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून देण्यात येत होत्या. दरम्यान, न्यायालयातून निकाल लागल्यानंतर दोन्ही काकांची नावं सातबारा उताऱ्यावर लागली. त्यामुळे त्यांनी चरणसिंगला शेतात येण्यास मनाई केली.
या होणाऱ्या त्रासाला कंटाळून चरणसिंगने 3 जूनला रात्री आठ वाजेच्या सुमारास चेतन जाधव यांना फोन केला. काका व त्यांची मुलं त्रास देत असून या त्रासाला कंटाळून जीव देत असल्याचं सांगितलं. तसेच, रात्री दहाला चरणसिंगने काका आणि त्यांच्या मुलांच्या त्रासामुळे मी जीव देत आहे, अशी चिट्टी व्हॉट्सअपवर टाकली. हा मेसेज वाचून चेतन घाबरून त्याच्या शोधासाठी निघाला. चेतन व त्याच्या मित्रांनी जामदा शिवारात चरणसिंगचा शोध घेतला असता तो शेताच्या बांधावरील झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याच्या खिशात चिठ्ठी मिळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर जीव देण्यात प्रवृत्त केल्याप्रकरणी काका वजेसिंग जाधव, शांताराम जाधव, प्रतापसिंग जाधव, जगदीश जाधव, किरण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: young man gave his life while leaving a phone call to his brother, a message to his friends