कांद्याला भाव नाही, घरात नऊ जणांची जबाबदारी, २५ वर्षांच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाउल
Beed News: कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, हातात पैसा देखील आला नाही, घरात नऊ जणांची खांद्यावर जबाबदारी यातूनच तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याचा आरोप.
बीड: शेतात पिकवलेला कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, हातात पैसा देखील आला नाही, घरात नऊ जणांची खांद्यावर जबाबदारी, यातच लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं याची विवंचनेतून बीडमधील २५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.
संभाजी अर्जुन अष्टेकर असे आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज आपल्या शेतात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे
एकीकडे घरात वृद्ध आई-वडील, तर दुसरीकडे दोन बहिणी, त्यात एकीच्या कपाळी वैधव्य, तिची दोन मुलं, याशिवाय एक भोळसर भाऊ अशा सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी संभाजी अष्टेकर याच्या खांद्यावर होती. अवघं २५ वर्ष वय असलेल्या या तरुण पोरावर घरातील नऊ व्यक्तींची जबाबदारी आली होती. त्यात व्यवसाय शेतीचा. या सगळ्यांना सांभाळण्याच्या घोडदौडीत शेतीसाठी कर्ज घेतलं, कारण या शेतीच्या पिकातून कर्ज फिटेल आणि सगळ्यांचा उदरनिर्वाह होईल, या अपेक्षेतून कर्ज घेतलं, मात्र भाव नसल्यामुळे नैराश्य हाती आले.
कांदा पिकासाठी खाजगी सावकाराकडून कर्जत घेतलं, मनापासून शेतात मेहनत करून कांदा पीकही चांगलं आणलं. मात्र यंदा कांदा पिकाला फारसा भाव नाही, पीक आलं भरभरून, मात्र त्याचा पैसा हा मूठभरच आला, आता सावकारायचं कर्ज फेडायचं कसं, या सगळ्यांना जगवायचं कसं, या विवंचनेतून अखेर संभाजी अर्जुन अष्टेकर याने घरात कोणाला न सांगता त्याने टोकाचे पाउल उचलले. या घटनेने परिसरात देखील दुःख व्यक्त केले जात आहे. अवघ्या २५ व्या वर्षीच पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या या तरुणाचं कौतुक सगळेच करायचे, मात्र शेवटी महागाईने आणि शेतीमालाला भाव न मिळाल्याने बीड जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: young farmer committed suicide due to the responsibility of nine people in the house
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App