काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं
Satyajeet Tambe | Nashik Graduate Constituency Election: सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
Satyajeet Tambe: काँग्रेस नेते सत्यजित तांबे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरल्यापासून आजपर्यंतच्या घटनाक्रमाविषयी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीनंतर ते काँग्रेस पाठिंबा देणार की भाजपाला याबाबत चर्चा रंगली होती. दरम्यान, सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. २०३० मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन १०० वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे.
आता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला? असे विचारलं असता, मी अपक्ष निवडणूक लढलो आणि यापुढेही मी अपक्षच राहणार, असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोपही केले आहेत. “बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होतं,” असं ते म्हणाले. तसेच “महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील एकाही जागेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावती, नागपूरमधील उमेदवारांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग एकच उमेदवारी दिल्लीतून जाहीर का झाली? हे सर्व एका षडयंत्राचा भाग आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आपल्याला नाशिकऐवजी नागपूर आणि औरंगाबाद इथले एबी फॉर्म देण्यात आले, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसंच आपण अजित पवार, संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे सगळ्यांना फोन करुन पाठिंबा द्यावा म्हणून सांगितलं होतं, त्यांच्या संपर्कात होतो, असंही सत्यजित तांबे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
तांबे भाजपामध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच त्यांनी आपण अपक्ष म्हणून राहणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसने निलंबन मागे घेतल्यास पुन्हा पक्षात सक्रीय होणार का? असा प्रश्न तांबेंना विचारण्यात आला. “मी अपक्ष म्हणून निवडूण आलो आहे. अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. मी अपक्ष निवडून आलो असल्याने मी अपक्षच राहीन लोकहिताची काम करण्यासाठी प्राधान्य देईन. मी देवेंद्रजींकडे जाईन, अजितदादांकडे जाईन, थोरातांकडे जाईन, पवारसाहेबांचे आभार मानतो कारण त्यांनी सुरुवातीलाच हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असून तो त्यांनी सोडवला पाहिजे अशी भूमिका घेतली,” असं सत्यजीत तांबे म्हणाले. “मी काँग्रेस सोडली नाही. पण मी अपक्ष आहे आणि अपक्षच म्हणूनच जनतेसाठी काम करत राहणार,” असंही ते म्हणाले.
Web Title: Will you support Congress or BJP Satyajeet Tambe said clearly
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App