Home अहमदनगर गोळ्या झेलू, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही- जरांगे पाटील

गोळ्या झेलू, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही- जरांगे पाटील

Breaking News | Maratha Reservation: सत्तेची धग व मस्ती कोणाच्या डोक्यात गेली असेल तर ती उतरवण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा, असे आवाहन संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील.

will take bullets, but we will not withdraw without Maratha reservation - Jarange Patil

पाथर्डी: मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे. ६० ते ७० वर्षे वेळ होता, तेव्हा का आरक्षण दिले नाही, ७ महिन्यांचा वेळ दिला, आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झेलण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केला तर हे आंदोलन असेच ताकदीने सुरू ठेवा. सत्तेची धग व मस्ती कोणाच्या डोक्यात गेली असेल तर ती उतरवण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा, असे आवाहन संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील आगसखांड शिवारात आंदोलकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे आलेल्या हजारो मराठा युवकांशी संवाद साधताना जरांगे-पाटील बोलत होते. सकाळी साडेदहा वाजता मिडसांगवी येथे जरांगे- पाटील यांचे आगमन झाले. तेथे मिडसांगवी व भालगावच्या ग्रामस्थांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर खरवंडी येथे खरवंडी, मुंगुसवाडे, ढगेवाडी येथील ग्रामस्थ व महिलांनी आंदोलकांना नाश्ता दिला. येळी, फुंदेटाकळी फाटा, आगसखांड फाटा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. फुंदेटाकळी फाटा येथे परिसरातील सुमारे पंचवीस गावांतून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आगसखांड फाटा येथे तालुक्यातील बहुतांश गावांतून जेवण, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे सभेत जरांगे-पाटील म्हणाले, मी माझे कुटुंब बाजूला सारले कुटुंब असून, मराठा समाज हेच माझे कुटुंब मानतोय. आरक्षणाचा लढा शांततेत लढतोय. सरकार बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतेय. महाराष्ट्रात ५४ लाख लोकांच्या कुणबी नोंदी सरकारला सापडल्या आहेत. मग त्यांना प्रमाणपत्र का दिले नाहीत? ही प्रमाणपत्रे तातडीने द्या. मागासवर्गीय आयोगाचे भूत समोर करू नका, ते होईल तेव्हा होऊ द्या,

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना प्रमाणपत्र द्या. जनतेने दिलेल्या पाठबळावरच ही लढाई सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केल्यास मागे राहिलेल्या लोकांनी काय करायचे, ते तुम्ही ठरवा. मी मरणाला घाबरत नाही. माझे जीवन मी समाजाला अर्पण केलेय. मेलो तरी चालेल; पण आरक्षणाचा गुलाल तुमच्या मुलांच्या डोक्याला लावल्याशिवाय राहणार नाही.

मराठा समाजातील दानशूरांनी एवढी जेवणाची व्यवस्था केली की, आंदोलकांना जेवण पुरून त्यांना सोबतही जेवणाची पाकिटे व पाण्याचे बॉक्स देण्यात आले. महिलांनी सकाळी उठून केलेल्या भाकरी व भाज्या दोन्ही ठिकाणी पोच केल्या होत्या. पाण्याच्या बाटल्यांनी भरलेले दहा ते पंधरा टेम्पो शिल्लक राहिले होते. जेवणही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले. यात युवकांचा सहभाग मोठा होता.

 जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, सीआयडी, ३० पोलीस अधिकारी व ३०० पोलीस कर्मचाऱ्यांनी मिडसांगवी ते करंजीपर्यंत दिवसभर राष्ट्रीय महामार्गावर थांबून अतिशय नियोजनपूर्वक बंदोबस्त ठेवला.

डीजेचा तालावर बेधुंद होऊन आनंदोत्सव साजरा करणारी युवकांची मांदियाळी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दिवसभर उभी होती. पंढरपूरच्या वारकऱ्यांना रस्त्यामध्ये जाताना जशा जेवणावळीच्या पंक्ती उठवल्या जातात, तशीच व्यवस्था मिडसांगवीपासून करंजीपर्यंत करण्यात आली होती. जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केला जात होता. सर्व जातीधर्माचे लोक सेवेमध्ये सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या भावनांशी सहमती दर्शवत सर्वांनीच योगदान दिले.

Web Title: will take bullets, but we will not withdraw without Maratha reservation – Jarange Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here