प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Nagpur Crime: प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वर्गमैत्रिणीसह प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पीयूषा वेळकर (२६, नवीन कामठी) असे मृत युवतीचे नाव आहे. तर सागर राजू करडे (३०, कन्हान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीयूषा ही नवीन कामठीत आई वडील आणि भावासह राहते. तिचे वडील व्यवसाय करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख वर्गमित्र सागर करडे याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असताना सागरने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकर दिला. दोघांनीही कुटुंबियांची परवानगी घेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत विचारणा करण्याचे ठरविले. दोघांचेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न केल्यानंतर जगायचे कसे? असा प्रश्न करीत नोकरी लागल्यावर कुटुंबियांशी चर्चा करुन लग्न ठरवू, असे सांगून पीयूषाची समजूत घातली. पीयूषा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली तर सागर मुंबईला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागला.
पीयूषा आणि सागर दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आता लग्नाला कुणी विरोध करणार नाही, अशी धारणा ठेवून सागरकडे लग्नाचा तगदा लावत होती. मात्र, सागर वेगवेगळी कारणे देऊन लग्नास टाळाटाळ करीत होता. प्रियकराची लग्नास टाळाटाळ बघता पीयूषा नैराश्यात गेली. तिने नोकरी सोडून दिली आणि घरी राहायला लागली. यादरम्यान, तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले.
१० डिसेंबरला पीयूषाने सागरला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी सागरने तिला थेट लग्न करण्यास नकार देऊन चांगला मुलगा बघून लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबियांनी लग्न करण्यास नकार दिल्याचा बहाणा सागरने करीत पुन्हा लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीयूषा आणखी नैराश्यात गेली. ती अबोल झाली. तिने वडिलांकडे सागरबाबत सांगून त्याच्या आईवडिलांना लग्नाबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सागरने लग्न करण्यास नकार देऊन संबंध संपल्याचे सांगितले. त्यामुळे पीयूषाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. सागरने प्रेमात दगा दिल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे तिने आईकडे बोलून दाखवले होते. आईने तिला धीर देऊन सांत्वन केले होते. मात्र, पीयूषाने २९ डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी सागरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Suicide of girlfriend, crime against boyfriend
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News