Bhandardara Dam Update: आज भंडारदरा धरण भरणार का?
Bhandardara Dam Update: मुसळधार पावसामुळे २४ तासांत म्हणजेच गुरुवारी सायंकाळी भंडारदरा भरण्याची शक्यता.
भंडारदरा: भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे २४ तासांत म्हणजेच गुरुवारी सायंकाळी भंडारदरा भरण्याची शक्यता आहे.
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचे तांडवनृत्य सुरू असल्याने धरणात काल गत बारा तासांत 305 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. परिणामीे काल बुधवारी सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा 10019 दलघफू (90.14 टक्के) पाणीसाठा झाला होता. वाढलेला पाऊस आणि होणारी आवक लक्षात घेता आज गुरूवारी दुपारपर्यंत पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी 10500 दलघफू पाणीसाठा झाल्यावर येणारे पाणी नदी पात्रात सोडण्याची दाट शक्यता आहे.
गत दोन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींनी जोर धरल्याने डोंगरदर्यावरील धबधबे पुन्हा आक्राळविक्राळ रूप धारण करीत आहेत. ओढे-नाले भरभरून वाहत असून धरणात विसावत आहेत. काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 75मिमी झाली आहे. पडणार्या पावसामुळे पाणलोटात पाणीच पाणी झाले असून जनजीवन गारठून गेले आहे. त्यामुळे शेतकरी आणि जनावरे यांना मोठ्या संकटाशी सामना करावा लागत आहे.
संकेतानुसार सध्याच्या काळात धरणात 10500 दलघफू पाणीसाठा ठेवण्यात येतो. त्यानंतर येणारी आवक ओव्हरफ्लोच्या माध्यमातून नदी पात्रात सोडण्यात येतो. सध्या पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे आज दुपारी हा पाणीसाठा 10500 दलघफू पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दुपारी प्रवरा नदीत सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यापूर्वीही हे धरण ओव्हरफलो झालेले आहे.
निळवंडे धरणातही पाण्याची चांगली आवक होत आहे. काल सायंकाळी 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 7454 (89.50टक्के) दलघफू झाला होता. या धरणातून प्रवरा नदीत 2447 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे यात आज आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या धरणात नवीन पाण्याची आवकही वाढत आहे. पडत असलेल्या पावसाचा विचार करता चोवीस तासांत धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दलघफूहून अधिक होईल आणि धरण तांत्रिकदृष्टीने भरेल. धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दलघफू झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. -अभिजित देशमुख, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग, भंडारदरा
Web Title: Will Bhandardara Dam be overflow today