संगमनेर: लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरी पळाली
Sangamner Crime: संगमनेरची घटना : चार जणांविरुद्ध गुन्हा.
संगमनेर : मुलाचे लग्न जमत नसल्याने मध्यस्ती व्यक्तीमार्फत लोणार (जि. बुलडाणा) येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुला-मुलीची पसंती झाली. निळवंडे (ता. संगमनेर) येथे विवाह पार पाडला. त्यानंतर दोनच दिवसांनी नवरी निघून गेली.
मुलाचे लग्न जमत नसल्याचा गैरफायदा घेऊन आमच्या भावनेशी खेळून फसवणूक केली, अशी फिर्याद मुलाच्या वडिलांनी दिल्याने नवरी तिचा बनावट भाऊ आणि आजी व इतर एक व्यक्ती अशा चार जणांविरुद्ध गुरुवारी (दि. २०) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशश्री नरहरी केंद्रे (नवरी, रा. शिवाजीनगर परळी, जि. बीड), हनुमंत सीताराम गर्जे (बनावट भाऊ, रा. आंबलवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड), यशोदाबाई अश्रू कराळे (बनावट आजी, रा. रायेगाव, ता. लोणार, जि. बुलडाणा), संतोष किसन खोडके (रा. जोगेश्वरी, ता. रिसोड, जि. वाशिम), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील ५५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून – गुन्ह्याची नोंद झाली आहे.
१९ वर्षीय व्यक्तीच्या मुलाचे लग्न जमत नव्हते. दरम्यान, ६ ऑगस्ट २०२२ ला कौठे कमळेश्वर येथील एका व्यक्तीने त्यांना माझे परिचयाचे लोणार (जि. बुलडाणा) येथे स्थळ असल्याचे सांगितले. दुसऱ्याच दिवशी त्या मध्यस्ती व्यक्तीसोबत मुलगा, मुलाचे वडील व इतर नातेवाईक लोणार येथे गेले, मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर रोख रक्कम १ लाख १० हजार देऊन आणि दीड तोळा सोने घालून विवाह करण्याचे ठरले. मुलाच्या वडिलांनी संतोष खोडके याच्याकडे दिलेले १ लाख १० हजार रुपये हे मुलीचा भाऊ हनुमंत गर्जे, मुलीची आजी यशोदाबाई कराळे आणि नवरी मुलगी यशश्री केंद्रे यांना वाटून द्यायचे असल्याचे खोडके याने त्यांना सांगितले.
९ ऑगस्टला निळवंडे येथेच घरासमोर विवाह पार पडला. त्यानंतर ११ ऑगस्टला यशश्री केंद्रे हिने लग्न झालेल्या मुलाला माझे पोटात दुखत आहे, मला गोळ्या आणून द्या, असे सांगितले. तो गोळ्या आणण्याकरिता गेला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना लाइट गेली. अंधाराचा फायदा घेऊन नवरी निघून गेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Web Title: wife ran away just two days after the marriage Crime Filed