अहिल्यानगर: तलावात उडी घेऊन पत्नीची मुलीसह आत्महत्या, मुलगा झाला पोरका
Breaking News | Ahilyanagar Suicide: पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या पत्नीने आपल्या २१ वर्षीय मुलीसह तलावात उडी मारून आत्महत्या केली.
पारनेर शहरालगतच्या तलावाजवळ गुरुवारी (३१ जुलै) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय ४२) व शिवांजली दत्तात्रेय औटी (वय २१) अशी या मृत माय-लेकींची नावे आहेत. मृत सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे पाच महिन्यांपूर्वी पारनेर-सुपे रस्त्यावर झालेल्या एका अपघातात निधन झाले होते.
पारनेर शहरात वास्तव्यास असलेल्या सुरेखा व शिवांजली या मायलेकी नेहमीप्रमाणे शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या आपल्या शेतीत काम करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता गेल्या होत्या. मात्र, सायंकाळचे सात वाजून गेले, तरी त्या घरी परत न आल्याने सुरेखा यांचा मुलगा तेजस याने शेताजवळ राहणाऱ्या आपल्या चुलत्यांना संपर्क करून आई व बहीण घरी आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी, शेजाऱ्यांनी या दोघींचा शोध सुरू केला; परंतु उशिरापर्यंत शोध न लागल्याने रात्री ११ वाजता पारनेर पोलिस ठाण्यात या दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, तलावाजवळ त्यांचा मोबाईल आढळून आला. त्यावरून पोलिस व नातेवाइकांनी तलाव परिसरात शोध घेतला असता, रात्री दीड वाजता सुरेखा यांची पिशवी तलावाच्या काठावर आढळली. काही अंतरावर तलावाच्या डोहात सुरेखा व शिवांजली यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी (१ ऑगस्ट) शवविच्छेदन झाल्यानंतर दोघींच्या मृतदेहावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
तेजस पोरका झाला
सुरेखा औटी यांचा मुलगा तेजस हा नुकताच बारावी पास झाला आहे. पाच महिन्यांपूर्वी तेजसच्या वडिलांचे छत्र हरपले, तर आता आई व बहीणही सोडून गेल्याने १८ वर्षीय तेजसवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तो आज पोरका झाला.
Breaking News: Wife and daughter commit suicide by jumping into lake