गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहिणींची माफी कोण मागणार? – डॉ. सुजय विखे
Sangamner Assembly Election 2024: कोणी पातळी सोडून बोलाल तर याद राखा, टायगर अभी जिंदा है. बोलणाऱ्याला तेथेच गाडून टाकीन, असे आव्हान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
संगमनेर: तालुका फक्त कुटुंब आहे असे म्हणून चालत नाही, तर जबाबदारी पार पाडावी लागते. आमची सहनशीलता ही कमजोरी समजू नका. आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे. तुमच्या मुलीला न्याय मिळाला पण गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहिणींची माफी कोण मागणार? असा परखड सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.
माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कोणी पातळी सोडून बोलाल तर याद राखा, टायगर अभी जिंदा है. बोलणाऱ्याला तेथेच गाडून टाकीन, असे आव्हान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
अंभोरे (ता.संगमनेर) येथे आयोजित केलेल्या सभेत डॉ. विखे पाटील यांनी आज ‘लाव रे तो व्हिडीओ’ मधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्या जाळण्याच्या कृत्याचा घटनाक्रम दाखवून मला मारण्यासाठी आमदारांचे बंधू इंद्रजित थोरात यांनीच हे सर्व कटकारस्थान रचले असल्याचा थेट आरोप केला. डॉ.जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच विखे पाटील कुटुंबाच्यावतीने दिलगिरी व्यक्त करून डॉ. विखे पाटील म्हणाले, जो व्यक्ती बोलला तो आता जेलमध्ये आहे. पण आमच्या सभेसाठी आलेल्या महिलांना मारहाण करणारे काँग्रेस कार्यकर्ते उघडपणे तालुक्यात फिरत आहेत.
आमची संस्कृती काढून राज्यात बदनामी केली. पण आमच्या मतदारसंघात येवून वडिलांबद्दल वाटेल ते बोलता. ज्याची ग्रामपंचायतमध्ये निवडून यायची लायकी नाही ते बोलतात आणि या तालुक्याचे आमदार हसतात. ही तुमची संस्कृती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमच्या तालुक्यात येवून आरोप झाले तरी एक सायकल सुध्दा आम्ही जाळली नाही. आमच्यावर लोकशाही मानण्याचे संस्कार आहेत. मला डोक्यावर पडला म्हणता आता कोण कोणाला पाडतो हेच दाखवतो असा टोलाही त्यांनी लगावला. वडिलांवर बोललो तर डॉ. जयश्रीताईंना खूप लागले. पण माझ्या वडिलांवर तुम्ही बोलता हे तीन वर्ष आम्ही सहन केले. मात्र आता पुन्हा बोललात तर माझी कशाचीही तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला.
Web Title: Who will apologize to our sisters who were dragged from the car and beaten
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study