थोरातांचा पाठिंबा कुणाला? शुभांगी पाटलांना की तांबेंना? थेट सांगितले
Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe, Ahmednagar News; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान केले , स्वत: थोरात यांनी मात्र अद्याप यावर काहीही भाष्य केलेले नाही.
अहमदनगर: सत्यजीत तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म नव्हता. मात्र पक्षाने दोन कोरे एबीफॉर्म दिले होते. अर्थात उमेदवाराला एकच फॉर्म दिला जातो. पण काही अडचण नको म्हणून पक्षाने दोन फॉर्म दिले, यापेक्षा आम्ही काय करू शकतो. त्यांना दिलेले एबी फॉर्म त्यांनी कचऱ्यात टाकून दिला. जर सत्यजीत तांबेंना उमेदवारी पाहिजे होती. तर ते बोलले पाहिजे होते. पण ते कोणी काही बोलले नाही. शेवटपर्यंत डॉ. सुधीर तांबेच अर्ज भरणार असे सांगण्यात आले. पण त्यांनी अर्ज दाखल न करता मुलाचा अर्ज दाखल केला. याला पक्ष काय करणार, त्यांच्या परिवारातील वाद होता.पण पक्षाला आरोपीच्या पिंजरात उभे केले जात आहे. त्यात पक्षाचा काय दोष आहे, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीतनंतर आ. पटोले बोलत होते.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय? याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान केले आहे. यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, “बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझेही नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना आदेश देऊ शकत नाही. मात्र, त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार ते पक्षासोबतच आहेत”, असे पटोले म्हणाले. या मतदारसंघात भाजपने तांबे यांना आतून पाठिंबा दिल्याचे समोर आले असताना काँग्रेसकडूनही आता थोरात यांची भूमिका अशा पद्धतीने स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र, स्वत: थोरात यांनी मात्र अद्याप यावर काहीही भाष्य केलेले नाही.
पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी आणि त्यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांसंबंधी निर्णय घेताना पक्षाची काहीही चूक झालेली नाही. पक्षाचे नियम आणि शिस्तीप्रमाणेच सर्व प्रक्रिया झाली आहे. तांबे यांना भाजपचा पाठिंबा असणार याची कुणकुण आधीच लागली होती. आता भाजपने पाठिंबा दिला की नाही, हे मला माहिती नाही. थोरात सध्या आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते जाहीरपणे भूमिका मांडू शकत नसतील. मात्र, माझे त्यांच्याशी जे बोलणे झाले, त्यानुसार ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना मी आदेश देऊ शकत नाही. त्यांनीच पक्षाची भूमिका समजावून घेऊन तशी कृती करणे अपेक्षित आहे. तसे ते करतील असे मला वाटते. जे कोणी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणारच. तशी ती करण्यात आली आहे. त्यामुळेच नगरच्या जिल्हाध्यक्षाला निलंबित आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे” असेही पटोले म्हणाले.
पटोले म्हणाले, पक्षाकडून कोणताही गोंधळ झाला नसल्याचे सांगत याला संपूर्णत: तांबे कुटुंबीयच जबाबदार आहे. उमेदवारी झाल्यावर माझ्याकडे येऊन आभार व्यक्त करणारे डॉ. तांबे यांना त्याचवेळी आपल्याऐवजी मुलाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली नाही. पक्षाची उमेदवारी देणे ही एका दिवसातील प्रक्रिया नसते. या मतदारसंघातही ती खूप लवकरच सुरू झाली होती. यासाठी मी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी नेत्यांची बैठक झाली. त्यात डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला. तो जाहीरही झाला. त्यानंतर डॉ. तांबे भेटायला आले. त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. तेव्हा आणि त्यानंतरही त्यांनी आपल्याऐवजी मुलगा सत्यजीत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली नव्हती. तशी ती केली असती, तर तेव्हाच त्यावर विचार झाला असता. पुढे सत्यजीत यांच्यासंबंधी भाजपच्या संबंधाने वेगळी कुजबुज ऐकायला मिळू लागली. आम्ही सावधच होतो. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराचं नाव टाकून आणि एकच प्रत दिली जाते. या प्रकरणात आम्ही दोन आणि तेही कोरे फार्म दिले होते. त्यांच्या परिवारातील वादात आम्हाला पडायचे नव्हते. तुमच्यापैकी जो कोणी उमेदवार ठरेल, त्याचे नाव टाकून अर्ज दाखल करा, असे त्यांना सांगितले होते. शेवटपर्यंत डॉ. तांबे अर्ज भरणार असे सांगत होते. ऐनवेळी डॉ. तांबे यांनी अर्ज भरलाच नाही, सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आमदार बाळासाहेब थोरात यांची तब्येत बरी नसल्याने ते सध्या रुग्णालयात आराम घेत आहे. त्यांच्याशी पक्षाने नेते संपर्क केला असून त्यांनी आपण पक्षाबरोबर असल्याचे स्पष्ट केल्याचे पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
Web Title: Who supports the Thorat Shubhangi Patil or Satyajeet Tambe
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App