ना. विखे पाटील जलसंपदा मंत्री झाल्यावर पहिली प्रतिक्रया
Ahilyanagar News | radhakrishana Vikhe Patil: कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात आणण्याचे पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त.
अहिल्यानगर: कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात आणण्याचे पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ. विखे पाटील फौंडेशन येथे जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांचे आशिर्वाद त्यांनी घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्याची एक संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे सांगून ते म्हणाले, कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वळविण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता. त्याचेच आता धोरणात रूपांतर झाले. पंतप्रधान मोदी यांनीही आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणाचे ध्येय ठेवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याने गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात पाणी वळविण्याचे ऐतिहासिक काम भविष्यात पूर्ण करण्यासाठी आता वाटचाल असेल. कृष्णा खोर्यातील पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असे धोरण घ्यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्याच्या वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. बीड आणि परभणी येथील घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले, या दोन्हीही घटना अतिशय दुर्दैवी असून, दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. घटनेबाबत आता चौकशी समितीही नेमण्यात आली असून, या घटनेचे आता राजकारण करू नये. विरोधी पक्षनेते राहुल गांधी येवून जातील. परंतू त्यानंतर निर्माण होणारा सामाजिक तणाव तसेच जातीजातींमध्ये उमटणारे पडसाद याची जबाबदारी ते घेणार का? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.
जरांगे पाटील यांनी थोडा वेळ द्यावा
मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले आरक्षण कायदेशीरदृष्ट्या टिकले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचे सरकार सकारात्मकच आहे. मात्र मध्यंतरी महाविकास आघाडी सत्तेवर आल्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले. आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी गंभीर नव्हते याचे पाप त्यांच्या डोक्यावर आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, चर्चेतून हा प्रश्न सोडविता येईल. जरांगे पाटलांनी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे, असे ते म्हणाले.
Web Title: Vikhe Patil’s first reaction after becoming Water Resources Minister
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News