अप्पर तहसील कार्यालय आश्वीलाच होणार ! मंत्री विखे यांची स्पष्टोक्ती, थोरातांवर टीका
Breaking News | Sangamner News: अप्पर तहसील कार्यालय आश्वी येथेच होणार अशी निःसंदिग्ध भूमिका मंत्री विखे यांनी जाहीरपणे घेतली आहे. आता याबाबत तालुक्यातील राजकारणात नेमके काय घडते याकडे जनतेचे लक्ष लागले.
संगमनेर : विधानसभा निवडणुकीच्या धुराळा खाली बसतो न बसतो तोच संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यावरून राजकारण पुन्हा तापले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले होते. या पार्श्वभूमीवर अप्पर तहसील कार्यालय आश्वी येथेच होणार अशी निःसंदिग्ध भूमिका मंत्री विखे यांनी जाहीरपणे घेतली आहे. आता याबाबत तालुक्यातील राजकारणात नेमके काय घडते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावा बाबत समाविष्ट गावातील लोकांची चर्चा करू याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही असा तोडगा काढू त्यासाठी मंत्री विखे यांच्याशी आपण स्वतःच चर्चा करू अशी भूमिका आमदार खताळ यांनी घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आश्वी येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान अप्परता तहसील कार्यालय येथेच होणार अशी खंबीर भूमिका पालकमंत्री विखे यांनी जाहीर केली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे नव्याने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर मोठे वादंग उठले होते. नेहमीप्रमाणे थोरात विखे या आजी-माजी मंत्र्यांमध्ये या प्रस्तावावरून संघर्ष उफाळला होता. या प्रस्तावाला विरोध नोंदवताना माजी मंत्री थोरात यांनी संगमनेर हा विस्ताराने मोठा तालुका असला तरी शहर मध्यवर्ती ठिकाणी आहे. तहसीलदार प्रांताधिकारी व इतर सुसज्य कार्यालय येथे करून ठेवली आहेत. असे असताना शहराच्या अगदी जवळ असलेली गावे देखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहे. तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता त्यानुसार कृती समिती देखील गठीत झालेली आहे.
यावेळी माजी मंत्री थोरात यांच्यावरही मंत्री विखे यांनी टीका केली. ते म्हणाले, तोडण्याची भाषा आम्ही कधीही केली नाही. अप्पर तहसिल कार्यालय हे जनतेच्या सुविधेसाठी आहे. विधानसभेला तालुक्यातील जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेला मिळालेले स्वातंत्र्य आता तुम्ही हिरावून घेवू नका. आश्वीच्या लोकांना अप्पर तहसिल कार्यालय हवे आहे, इथले त्यांच्या समर्थकांना देखील हे कार्यालय हवे आहे. यापुर्वी सुध्दा पोलिस स्टेशनमध्ये समाविष्ठ असलेली गावे त्यांनी जाणीवपुर्वक काढून घेतली होती. उच्च न्यायालयात लढाई करुन, ही गावे पुन्हा आश्वीमध्ये समाविष्ठ केली याकडे लक्ष वेधून मंत्री विखे म्हणाले की, अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात आता महसूल विभागाने हरकती मागविल्या आहेत. महसूल मंडळांची रचना झाल्यानंतर अप्पर तहसिल कार्यालयाची निर्मिती होईल. ज्या गावांना समाविष्ठ व्हायचे नसेल त्यांना उगळून हे कार्यालय होणारच असे ठामपणे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीत तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडविले आहे. तुमच्या ‘यशोधन’ मधूनच तालुक्यातील जनतेला मुक्तता हवी होती. जनतेने केलेल्या परिवर्तनातूनच अमोल खताळांसारखा एक सामान्य तरुण लोकांनी आमदार म्हणून निवडून दिला. आम्ही जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नाही. अप्पर तहसिल कार्यालयाची चर्चा सुरु झाली तर यांना स्वातंत्र्याची लढाई आठवली. आता जरा शांत बसा, जनतेने तुमच्या बाबतीत निर्णय केला आहे. त्यांना त्यांचे काम करु द्या. तुमच्या कारकीर्दीत वाळु आणि क्रशर माफियांना वैभव प्राप्त झाले. महायुतीचे पाठबळ हे जनतेच्या पाठीशी कायम असल्याचा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.
Web Title: Upper Tehsil office will be in Ashwila! Minister Vikhe’s clarification