Home महाराष्ट्र थापांचा महापूर! उद्धव ठाकरेंचे अर्थसंकल्पावरून टीकास्त्र

थापांचा महापूर! उद्धव ठाकरेंचे अर्थसंकल्पावरून टीकास्त्र

Breaking News | Budget 2024: निवडणुकीच्या तोंडावर सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प, आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका.

Uddhav Thackeray's criticism of the budget

मुंबई: राज्य सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सर्वसामान्य, आर्थिक दुर्बल घटकांना सामावून घेत असल्याचा दावा सरकारने केला. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प, आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची टीका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेली खोटी आश्वासने आणि थापांना कंटाळून चिडलेल्या राज्यातील जनतेने दणका दिला. आताही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी जनता भाजपला विधानसभेत धडा शिकवणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मागील दोन वर्षांत सरकारने ज्या योजना जाहीर केल्या, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. या सर्वांची तज्ज्ञांची एक समिती नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी, असे ठाकरे म्हणाले. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. पण लेकाचे काय, असा सवाल केला. लोकसभेत दणका मिळाल्यानंतर महिला वर्गाची मते खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पातून केला आहे. एक प्रकारे हा एक जुमला संकल्प आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. बेरोजगार तरुणांच्या रोजगार वाढीसाठी सरकारने एकही तरतूद केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे) केली होती. सरकारने ती मान्य केली. परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी मात्र त्यांनी मान्य केलेली नाही. तसेच वीज बिलाची आजपर्यंतची थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? हे स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. १ लाखाच्या खत विक्रीतून यापूर्वी जीएसटीद्वारे १८ हजार रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होत होते. त्यापैकी ६ हजार रुपये शेतकरी मदतीचे वगळले तरी बाकीच्या राहणाऱ्या १२ हजार रुपयांचे काय, असा सवाल त्यांनी केला आहे. एकीकडे लुटायचे, दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणणारी खोटी मलमपट्टी लावायची. मात्र शेतकरी त्रस्त झाले असून ते या सरकारला धडा शिकवण्यासाठी विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत, असेही पुढे ते म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray’s criticism of the budget

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here