संगमनेरात अज्ञात व्यक्तींकडून दुचाकी व चार चाकीस आग, दहा लाखांचे नुकसान
Breaking News | Sangamner Fire: अज्ञात व्यक्तीने दोन चारचाकी वाहनांना पेटवून दिल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर – तालुक्यातील घुलेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दोन चारचाकी वाहनांना पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत दोन वाहनांचे सुमारे ९.९३ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
अनिल गंगाधर राऊत (रा. घुलेवाडी) हे पत्नी छाया व मुलगा समाधानसोबत राहतात. राऊत हे व्यवसायाने चालक असून, त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी दोन गाड्या वापरात घेतल्या होत्या. यामध्ये एमएच ०८ आर ८८०४ ही टाटा विंगर गाडी त्यांनी राहुल बुरुडे यांच्याकडून एक महिन्यासाठी वापरासाठी घेतली होती. तर दुसरी एमएच०४ जीपी ३३३२ ही ट्रॅम्पो ट्रेव्हल्सची गाडी त्यांनी कोटक बँकेकडून घेतली होती.
दि. १९ मे रोजी रात्री १० वाजता त्यांनी ही दोन्ही वाहने आपल्या घरासमोर लावून ते घरात झोपले होते. मात्र, २० मे रोजी पहाटे ३:५० वाजता घरच्यांना अचानक जाग आली असता, त्यांनी पाहिले की दोन्ही गाड्यांना आगीने वेढले आहे. तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तोपर्यंत गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
या आगीत टाटा विंगर (किंमत २,९८,०००/-) व ट्रॅम्पो ट्रेव्हल्स (किंमत ६,९५,०००/-) अशा एकूण ९,९३,०००/-किमतीच्या गाड्या जळून खाक झाल्या.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, कोणी अज्ञात इसमाने हेतुपुरस्सर ही आग लावली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास संगमनेर शहर पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई लोखंडे करीत आहेत.
राऊत परीवाराचा उदरनिर्वाह या वाहनांवर अवलंबून होता. एक वाहन दुसऱ्याचे तर एक वाहन कर्जावर घेतले होते. मात्र अज्ञातांनी मागील कोणत्यातरी वादाचा राग काढून किंवा परिसरात दहशत पसरविण्यासाठी अशा प्रकारचे गैरकृत्य केले आहे. मात्र त्याचा मोटा फटका राऊत परिवाराला बसला आहे. त्यामुळे परिसरात याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
Web Title: Two-wheeler and four-wheeler set on fire by unknown persons