चालत्या रिक्षातून दोन विद्यार्थिनीने घेतली उडी, एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी
नाशिक | Nashik: चालत्या रिक्षातून दोन शाळकरी विद्यार्थिनीने घाबरुन उडी मारल्याने एका मुलीचा जागीच मृत्यू तर एक जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सिन्नर-ठाणगाव आटकवडे शिवारात रविवारी घडली.
गायत्री अशोक चकणे (14, रा. वडगाव पिंगळा, हल्ली मुक्काम आटकवडे) असे मयत मुलीचे नाव आहे.
डुबेरे येथील जनता विद्यालयात नुकतीच दहावीत गेलेली गायत्री आणि पाचवीची विद्यार्थिनी सायली भगवान आव्हाड (11, रा. आटकवडे) या दोन्ही विद्यार्थिनी सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यासाठी आणि गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. गुणपत्रिका घेऊन घरी परतत असताना डुबेरे येथून सिन्नरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या समीर अहमद शेख यांच्या ॲपे रिक्षाला हात दाखवून त्या रिक्षात बसल्या होत्या.
दोन्ही विद्यार्थिनी बसलेली रिक्षा आटकवडे शिवारात आली. मात्र, रिक्षाचालकाला या मुलींना तेथे उतरून देण्याचे लक्षात आले नाही. यानंतर तो सरळ रिक्षा सुरु ठेवली. याचवेळी पाठीमागे बसलेल्या मुलींनी मोठ्याने सांगून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालक समीरला या विद्यार्थिंनींचा आवाज ऐकू आला नाही. या विद्यार्थिंनींचा आरडाओरडा पाहून काही वाहनधारकांनीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा भरधाव वेगात होती. या परिस्थितीत रिक्षा न थांबल्याने दोन्ही मुली घाबरल्या आणि यावेळी गायत्रीने चालत्या रिक्षातून उडी घेतली. इतकेच नव्हे तर तिला पाहून सायलीनेही उडी घेतली.
रिक्षा वेगात होती. त्या भरधाव वेगात गायत्रीने रिक्षातून उडी घेतली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थिनी सायलीच्या डोक्याला आणि हाताला मार लागून ती गंभीर जखमी झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी रिक्षाचालकाला थांबवल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. स्थानिकांनी सिन्नरमधील श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकाचालक गणेश काकड यांना कळवल्यावर त्या मुलींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी गायत्रीला तपासून मयत घोषित केले. तर सायलीवर उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षण विजय माळी, एएसआय सारूकते व चेतन मोरे यांनी पंचनामा केला. जखमी सायलीच्या जबाबावरून रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Web Title: Two students jumped out of a moving rickshaw, killing one and injuring