संगमनेर तालुक्यात दोन चंदनतस्कर जेरबंद
Sangamner News: तालुक्यातील बोटा शिवारातून दोन चंदन तस्कर (smugglers Arrested) घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारातून दोन चंदन तस्कर घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून संगमनेर तालुक्यातील घारगाव व साकूर परिसरात लुटमार करणारे सीसीटीव्हीत कैद झालेल्या तीन चोरट्यांचा शोधार्थ पोलीस असताना त्यांना बोटा शिवारात चंदनाची तस्करी करणारे दोघेजण मिळून आले. पोलिसांनी त्यांना जेरबंद केले असून त्यांचेकडून 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.27 फेब्रुवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन संदीप मधे (वय-22,रा.गाढवलोळी,शेळकेवाडी शिवार,अकलापूर हल्ली रा.विजेविहरा,फापाळेवाडी शिवार ओतुर, ता. जुन्नर जि.पुणे) व अनिल मारूती वारे (वय-27,रा.फापाळेवाडी,विजेविहरा,ओतुर, ता.जुन्नर, जि.पुणे) या दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोटा शिवारातील मुक्ताई मंदिरा समोरील खडकाळ माळरानावर संशयित इसम असल्याची माहिती ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे, गणेश लोंढे, किशोर लाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत चंदनाच्या लाकडांचे लहान तुकडे, करवती आदी मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहेत. त्यांनी चंदन कोठून आणले याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. मंगळवारी वरील दोघांनाही संगमनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Web Title: Two sandal smugglers Arrested in Sangamner taluka
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App