अकोले: अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत दोन घरे भस्मसात
Breaking News | Akole: संसारोपयोगी साहित्य खाक, सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
राजूरः अकोले तालुक्यातील रंधा बु, येथील दोन घरे भस्मसात झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. खासगी क्षेत्रास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत दोन्ही कुटुंबाचे संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाल्याने ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी रंधा धबधबा शिवारातील खासगी क्षेत्रास अज्ञात व्यक्तीने आग लावली. सध्या झाडांची पानगळ होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पडलेला पालापाचोळा, वाळलेले गवत असल्याने काही वेळात आगीने उग्ररूप धारण केले. आग आटोक्यात न आल्याने याच भागात एका बाजूला व शेजारी शेजारी असणाऱ्या शीलाबाई हरी बांबळे व यशोदाबाई देवराम पोटकुले यांची घरे आगीने घेरली.
आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. स्थानिक प्रशासनाने तातडीने राजूर वनविभागालाही मदतीसाठी बोलावले, अकोले नगर पंचायतचे अग्निशामक दलही घटनास्थळी पोहोचले मात्र सर्वांचे प्रयत्न निरर्थक ठरले. दोन्ही कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला. राजूर आणि भंडारदरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी इतरत्र पसरू पाहणारी आग आटोक्यात आणली.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
शनिवारी सकाळी महसूल विभागाने पंचनामा केला यात दोन्ही कुटुंबाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा समोर आले आहे. संसारोपयोगी सर्व साहित्य जळून गेले. फक्त अंगावरील कपडे शिल्लक राहिले आहेत. आम्ही ग्रामपंचायतने व स्थानिक नागरिकांनी या दोघांनाही तातडीने लागणारी मदत केली. तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. शक्य तेवढी मदत करत आहोतच; पण दानशूर व्यक्ती आणि समाजसेवी संस्थांनी ही मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Two houses gutted in fire set by unknown person