मातेसह दोन बालकांचा धरणात बुडून मृत्यू
परभणी जिल्ह्यातील निवळी येथील घटना: मातेसह दोन बालकांचा धरणात बुडून(drowned)मृत्यू.
बोरी (जि. परभणी) : सरपण आणण्यासाठी ३० वर्षीय महिला दोन बालकांसह जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी १० वाजता गेली होती. तहान लागल्यामुळे ते तलावात उतरले असता, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. नसरीन रसूल पठाण (३०), आयान रसूल पठाण (तीन वर्षे), सना रसूल पठाण (दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत.
निवळी येथील नसरीन रसूल पठाण या सरपण आणण्यासाठी करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी दोन बालकांसह गेल्या होत्या. तहान लागल्यामुळे धरणाच्या काठी पाणी आणण्यासाठी त्या बालकांना घेऊन गेल्या असता, त्यांचा तोल गेल्याने त्या बुडाल्याचा संशय मंगळवारी दुपारी काही जणांना आला. त्यानंतर पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू झाले. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन चिमुकले या पाण्यात तरंगताना आढळून आले. मात्र, महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले. बुधवारी सकाळी जलाशयात नसरीन रसूल पठाण या देखील मृत अवस्थेत आढळून आल्या..
Web Title: Two children along with their mother drowned in the dam