दर पाच मिनिटाला कॉल, एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थिनीने संपविले जीवन
Breaking News | Suicide Case: वारंवार कॉल करून भेटण्याची मागणी करीत असल्याने जाचाला कंटाळून विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर: एकाच गावातील ओळख असल्याने वारंवार कॉल करून भेटण्याची मागणी करीत असल्याने जाचाला कंटाळून विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. २५ जुलैला दुपारी एन पाच परिसरातील मातादी हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. गायत्री बाबासाहेब दाभाडे (वय २१, मूळ रा. जानेफळ, ता. वैजापूर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दत्तू बाबासाहेब गायके (रा. जानेफळ) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी मयत गायत्रीची मावशी कल्पना गजानन सूर्यवंशी (वय ३५ रा. वैजापूर) यांनी तक्रार दाखल केली. सूर्यवंशी यांच्या मोठ्या बहिणीचे नाव ज्योती बाबासाहेब दाभाडे असून त्या व त्यांचे कुटुंब जानेफळ येथे राहतात.
दाभाडे यांची मुलगी गायत्री बाबासाहेब दाभाडे ही छत्रपती संभाजीनगरमधील एन ५ परिसरातील फोस्टर कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. गायत्री ही एन पाच परिसरातील वसतिगृहामध्ये राहत होती.
सूर्यवंशी या मार्च महिन्यात शहरात आल्या होत्या. यावेळी गायत्रीने मावशीची भेट घेत त्यांना गावातील मुलगा दत्तू गायके याच्यासोबत मी आधी बोलत होते; परंतु मी सध्या त्याच्याशी बोलत नसल्याने तो वारंवार कॉल करून त्रास देत भेटण्याची मागणी करीत असल्याची माहिती दिली.
यानंतर सूर्यवंशी यांची त्यांच्या चुलतभावाच्या लग्नात जानेफळ येथे दत्तूसोबत भेट झाली. यावेळी सूर्यवंशी यांनी दत्तूला गायत्रीला कॉल करून त्रास देऊ नको असे समजावले देखील होते. यानंतर त्याचे त्रास देणे थांबले नव्हते.
१७ जुलैला गायत्री पुन्हा मावशीला जानेफळ येथे भेटली असता तिने पुन्हा मावशीला दत्तूचा त्रास थांबला नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, गायत्रीने २५ जुलैला दुपारी एक वाजता वसतिगृहाच्या सीलिंग फॅनला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी गायत्रीने दत्तू गायकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मावशी कल्पना सूर्यवंशी यांनी केल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
Web Title: Tired of being harassed by repeated calls and demands to meet, the student committed suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study