पंचायत समितीमध्ये तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
Breaking News | Ahilyanagar: पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, एक ग्रामसेवक व एक ग्रामरोजगार सेवक या तिघांना तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून पकडल्याची घटना.
कर्जत: पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, एक ग्रामसेवक व एक ग्रामरोजगार सेवक या तिघांना तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून पकडल्याची घटना घडली आहे. कर्जत पंचायत समितीमधील कनिष्ठ लेखाधिकारी नामदेव कासले (रा. मेहबूबनगर काळेगाव, रोड अहमदपूर जि. लातूर), अनिल भोईटे ग्रामसेवक सध्या नेमणूक आळसुंदे ग्रामपंचायत व दीपक शेलार रोजगार सेवक ग्रामपंचायत कोंभळी या तिघांनी तक्रारदार यांना कोंभळी येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिर खोदण्यासाठी पंचायत समितीमधून चार लाख रुपये मंजूर झाले होते. हे पैसे विहिरीच्या कामानुसार टप्प्याटप्प्याने दिले जाणार होते.
यामधील दोन लाख 75 हजार 602 रुपये तक्रारदार यांना देण्यात आले असून राहिलेल्या एक लाख 23 हजार 924 रुपयांची बिल देण्याकरिता ग्रामरोजगार सेवक शेलार यांनी 21 तारखेला लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी संबंधित विभागाला याबाबत कळविले. चौकशी आणि खातर जमा झाल्यानंतर त्यानुसार 22 तारखेला शेलार यांनी पंचायत समिती येथे पंचांच्या समक्ष तक्रारदारास पैशाची मागणी केली व नामदेव कासले व अनिल भोईटे यांनी पैसे शेलार यांच्याकडे देण्यास संमती दिली व लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले.
23 तारखेला रात्री शेलार यांनी पंचासमक्ष तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानुसार या तिघांसह इतर दोघांवर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार किशोर लाड सचिन शूद्रक, गजानन गायकवाड, उमेश मोरे आणि दशरथ लाड यांनी केली.
Web Title: Three were caught red-handed while accepting bribes in the Panchayat Samiti
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study