Theft | संगमनेर: घराचा दरवाजा उघडून लाखो रुपयांची चोरी
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचा दरवाजा उघडून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ५८ हजाराचा ऐवज चोरी (Theft) केल्याची घटना घडली असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तळेगाव दिघे येथील सुमनबाई शांताराम दिघे या आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. रविवार व सोमवार दरम्यानच्या रात्रीच्या सुमारास उन्हाळा असल्याने दिघे कुटुंबीय घराबाहेर झोपले होते. रात्री १.३० ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. किचन रूमचा दरवाजा उघडून घरातील साहित्याची उचापाचक केली.
१० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे हार, सोन्याची साखळी, अन्य दागिने, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, कर्णफुले अंदाजे ११ तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी नेलेली घरातील कोठी गावातील काशीआई मंदिराच्या पाठीमागे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आली. चोरीचा हा प्रकार दिघे कुटुंबियांच्या सकाळी लक्षात आला.
याबाबत सुमनबाई शांताराम दिघे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०, ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण औटी व पोलीस नाईक बाबा खेडकर तपास करीत आहेत.
Web Title: Theft of lakhs of rupees by opening the door of the house