Theft | संगमनेर तालुक्यात घर फोडले, लाखोंचे सोने-चांदीचे दागिने लंपास
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथे अज्ञात चोरट्यांनी विकास नानाभाऊ कोरडे यांच्या घराच्या वरील पत्रा फोडून सोने चांदी व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार दिनांक २१ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घरफोडीत घरातील १९ तोळे सोन्याचे दागिने, १४ तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम २० हजार रूपये चोरून (Theft) पोबारा केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, घारगाव येथील असलेल्या कान्होरे मळा येथे विकास कोरडे हे आपल्या कुटुंबासोबत राहात आहे. ते शनिवारी सायंकाळी आळेफाटा याठिकाणी गेले होते. रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान ते आपल्या घरी आले. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता समोर घरातील सर्व सामान उचकापाचक केलेले दिसले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते तर घरातील सगळ्या डब्यांची , कपाटांचीही उचकापाचक केलेली दिसून आले हे पाहून ते पुरते घाबरून गेले.
चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती घारगाव पोलीसांना दिली. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, नामदेव बिरे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली.
Web Title: Theft in Sangamner taluka, lakhs of gold and silver jewelery robbery