Home संपादकीय शैक्षणिक संस्थेचे वटवृक्ष फुलविले, सर्वोदयमध्ये शिक्षक सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

शैक्षणिक संस्थेचे वटवृक्ष फुलविले, सर्वोदयमध्ये शिक्षक सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Teacher service completion ceremony held in Sarvodaya Vidya mandir Rajur

Rajur | राजूर: विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करीत घडलेल्या सुनील पाबळकर यांचे जीवन संघर्षमय राहिले. मात्र येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला संधी मानून त्यावर मात करून सत्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेने लावलेल्या विद्यालयाच्या रोपट्याचे संगोपन करीत त्याचे वटवृक्ष फुलाविल्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे गौरमय उदगार उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती  गौरव व कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. तसेच कर्तुत्वनिष्ठ, शिस्तबद्ध जीवन शैली, मनमिळावू, अभ्यासू, गणित विषयात निष्णात अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव आभाळे (माजी सचिव अकोले तालुका एजुकेशन संस्था, अकोले) होते.

येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उप प्राचार्य सुनील शंकर पाबळकर व कार्यालयीन अधीक्षक निवृत्ती मारुती आभाळे यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने संस्था व कर्मचाऱ्यातर्फे गौरव व कृतज्ञता सोहळा रविवारी १ मे रोजी पार पडला.

कार्यालयीन अधीक्षक निवृत्ती मारुती आभाळे यांचे सेवाभावी वृत्तीने कार्य, विद्यालयाच्या प्रशासकीय विभागात. कर्मनिष्ठेने व कर्तव्यद्क्षतेने श्रेष्ठत्तम सेवा देत राहिलात आपले व्यक्तित्व म्हणजे काम हाच परमेश्वर. गरिबीतून संघर्षमय जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विकास साधला.  नियोजनबद्ध काम, सचोटी, अकौंटंट मध्ये निष्णांत, मनमिळावू , कर्तृत्ववान अशी त्यांची गुणवैशिष्टे, एक आदर्श कुटुंब, सामाजिक व धार्मिक कार्य, इतरांना मार्गदर्शन करणे असे गौरमय उदगार उपस्थित मान्यवरांनी या सेवापूर्ती  गौरव व कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले.  

संस्था व विद्यालयतर्फे सर्व मान्यवरांच्या हस्ते सुनील पाबळकर व निवृत्ती आभाळे यांच्या सपत्नीक भेटवस्तू, शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागातर्फे तसेच गावातील विविध संस्था, सामाजिक, राजकीय व्यक्तींनी स्वतंत्रपणे सत्कार केला. यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.  शिक्षकांनी सेवानिवृत्त नंतर काही गंगाजळी आपण राखून ठेवली पाहिजे असा महत्वपूर्ण संदेश दिला. दोन्ही सत्कारमूर्तीना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

या सेवापुर्ती सत्काराला उत्तर देताना दोनही सत्कारमूर्तीं यांनी शाळेतील 33 वर्षातील अनेक कडू-गोडआठवणी उजाळा देऊन संस्था व शिक्षक त्यांचे आभार मानले तसेच कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे संचालक मिलिंद उमराणी, प्राचार्य मनोहर लेंडे, राजूरचे सरपंच गणपतराव देशमुख, उप-सरपंच गोकुळ कनकाटे, माजी उप-सरपंच संतोष बनसोडे, संस्था संचालक एस. टी. येलमामे, शामजी पन्हाळे, विजय पवार, माजी उपप्राचार्य विलास नवले, बारेकर सर, मुख्याध्यापक अंतुराम सावंत, जेष्ठ शिक्षक बादशाह ताजणे, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, जेष्ठ शिक्षक एस.पी. व्यवहारे, प्रकाश महाले, निळवंडे गावचे माजी सरपंच भाऊसाहेब आभाळे, रंगनाथ आभाळे, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, श्री. स्वामी समर्थ सेवेकरी,  नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक विद्यार्थी आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन एस. आर गिरी यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी केले. सूत्रसंचालन संतराम बारवकर यांनी केले. तर मान्यवरांचे आभार प्राचार्य मनोहर लेंडे यांनी व्यक्त केले.

सुनील शंकर पाबळकर (उप प्राचार्य) जीवन परिचय:

आपण गेली ३३ वर्षे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहात…..

आजपर्यंत आपण सेवाभावी वृत्तीने आपली सेवा पार पाडलीत. एक व्याख्याता, गणित विभाग प्रमुख या नात्याने आपले कार्य आदर्शवत असेच आहे. कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ अशा अनेकविध गुणांनी आपले जीवन श्रेष्ठतम असेच राहीले आहे. सालस, मितभाषी, निगर्वी, उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय, शिक्षक असणारे आपले व्यक्तीमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचे भांडारच आहे. राजूर  ही आपली जन्मभूमी आणि हीच आपली कर्मभूमी.

शांताबाई व  शंकर पाबळकर या दांपत्याच्या पोटी १ मे १९६४ रोजी एका सामान्य कुटूंबात आपला जन्म झाला. आपले प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण मंदिर राजूर तर माध्यमिक शिक्षण सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथे झाले. संगमनेर कॉलेज,संगमनेर येथून १९८७ साली गणित या विषयात आपण पदवी घेतली. १९८९ साली पुणे विद्यापीठ, पुणे  येथून पदव्यूत्तर शिक्षण घेवून संगमनेर बी.एड. कॉलेज,संगमनेर येथून  बी. एड. हे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले.

दि.  १३ जून १९८९  रोजी आपण सत्यनिकेतन संस्थेच्या गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे प्राध्यापक  म्हणून रुजू झालात. आणि आज आपण उपप्राचार्य या पदावर कार्यरत आहात. आपला वक्तशीरपणा, सहकार्याकडून काम करून घेण्याची हातोटी, अंतर्मनातील आपली कर्तव्यापोटी असलेली तळमळ ही खरच कौतुकास्पद आहे. 

विविध शिक्षणसंस्था, शिक्षक भरती साठी गणित विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती,गरीब हुशार व होतकरू विद्यार्थ्याना आर्थिक मदत व मार्गदर्शनाचे आपण काम केले. आपल्या याच कार्याबद्दल आपणाला सत्यनिकेतन संस्थेकडून गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त झाला.

सत्यनिकेतन पगारदार नोकरांची पतसंस्था उभारणी / सुरू करण्यास आपण सक्रीय सहभाग घेऊन ७ वर्षे संचालक म्हणून काम केले. श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र, राजूर उभारणीतही आपला सक्रीय सहभाग असून कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहात. 

आई, वडील यांनी केलेले संस्कार ही आपल्या आयुष्याची शिदोरी आहे. पत्नी सकल सौभाग्य संपन्न सौ. सुनीता यांची अखंड सावलीसारखी साथ यामुळे आपली यशस्वीता वलयांकित राहिली आहे.

निवृत्ती मारुती आभाळे (कार्यालयीन अधीक्षक) जीवन परिचय:

आपण गेली ३४ वर्षे सत्यनिकेतन संस्थेच्या कातळापूर या शाखेत लिपिक या पदावर रुजू झालात व आज सर्वोदय विद्या मंदिर राजूर या विद्यालयात कार्यालयीन अधीक्षक या पदावर कार्यरत आहात.

आजपर्यंत आपण सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहात. विद्यालयाच्या प्रशासकीय विभागात. कर्मनिष्ठेने व कर्तव्यद्क्षतेने श्रेष्ठत्तम सेवा देत राहिलात आपले व्यक्तित्व म्हणजे काम हाच परमेश्वर. निळवंडे ही आपली जन्मभूमी तर राजूर ही कर्मभूमी.

पार्वताबाई व मारुती आभाळे यांच्या पोटी १ जून १९६४ या दिवशी एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी पूर्ण करून पुढील शिक्षण सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथील वसतिगृहात राहून पूर्ण केले. कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने कमवा व शिका या योजनेतून अकोले महाविद्यालयातून बी.कॉम चे शिक्षण पूर्ण केले. तसेच बी.पी.एड.व्यावसायिक पदवी संपादन करून इंग्रजी व मराठी भाषा टंकलेखनात आपण उच्चतम श्रेणीच्या परीक्षाही उत्तीर्ण झालात व ग्रामीण विद्यार्थ्याना हे सगळे शिक्षण मिळावे या उद्देशाने श्रीदत्त टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केली.

अहमदनगर जिल्हा टंकलेखन व लघुलेखन संस्थांची संघटना, मुंबई या संघटनेचे १० वर्षे तालुका प्रमुख व ५ वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्य करत आहात. तसेच  सत्यनिकेतन पगारदार नोकरांची पतसंस्था उभारणी सुरू करण्यास आपण सक्रीय सहभाग घेऊन ५ वर्षे संचालक म्हणून काम केले. पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झालेली होती. त्यातही आपण चेअरमनपदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली. आज आपण निळवंडे गावातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून गावासाठी योगदान देत आहात.

 आई, वडील यांनी केलेले संस्कार ही आपल्या आयुष्याची शिदोरी आहे. पत्नी सकल सौभाग्य संपन्न सौ. प्रतिभा यांची अखंड सावलीसारखी साथ यामुळे आपली यशस्वीता वलयांकित राहिली आहे.

Web Title: Teacher service completion ceremony held in Sarvodaya Vidya mandir Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here