ग्रामसेवकाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या
Breaking News | Pune Suicide Case: ग्रामसेवकाच्या नावाने चिठ्ठी लिहून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पिंपरी : निघोजेच्या ग्रामसेवकाच्या नावाने चिठ्ठी लिहून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.३०) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश मच्छिंद्र मोहिते (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी आकाश रमेश मोहिते (वय २४, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्रामसेवक विष्णू लक्ष्मण गाडीलकर (रा. शिरूर), भास्कर जाधव, विलास भास्कर जाधव, संजय भीमराव जाधव, रुपेश दौंडकर, एक अनोळखी व्यक्ती आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे घडली. दौंडकरवाडी येथे रमेश मोहिते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या खिशात तीन चिठ्ठया सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत, ‘निघोजे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांनी रमेश यांनी केलेल्या कामाचे दीड लाख रुपये दिले नाहीत. ते मागितले असता देणार नाही असे म्हणत तुमचे कुटुंब बरबाद करीन. तसेच रमेश यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले होते. दुसऱ्या चिठ्ठीत फिर्यादींचा भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांनी भाऊ विकास आणि वडील रमेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कारणांवरून आपण आत्महत्या करत असल्याचे रमेश यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
Web Title: Suicide by writing a letter in the name of village servant
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study