अकोले: वादळी पावसामुळे विद्यालय भुईसपाट, विद्यार्थ्यांची गैरसोय
Akole News: वादळी पावसामुळे दुर्गम आदिवासी भागातील सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालय इमारत भुईसपाट.
अकोले: तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर सर्वदूर पावसाचे तांडव सुरु असून वादळी पावसामुळे दुर्गम आदिवासी भागातील सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालय इमारत गुरुवारी रात्री भुईसपाट झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढत असून पावसाचा हाहाकार माजला आहे. रात्री झालेल्या पावसाने जोगेश्वरी विद्यालय, सावरकुटे अक्षरश: भुईसपाट केले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली.
स्व. बाबुराव सखाराम बो-हाडे (बी. एस. बी) एज्युकेशनल संस्था जोगेश्वरी विद्यालयाची इमारत गुरुवारी रात्री भुईसपाट झाली. त्यामध्ये शाळेची भिंत पडून बाकांचे नुकसान झाले. उल्हासनगर या संस्थेच्या जोगेश्वरी विद्यालय, सावरकुटे हे वर्षानुवर्षे समाज. मंदिर, मारुती मंदिर तसेच खासगी घरांमध्ये भरत होते. मागील वर्षी संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आठवी, नववी व दहावीच्या वर्गासाठी नवीन वर्गखोल्या उभारल्या. सगळं अगदी व्यवस्थितपणे चालू होते. आठवी, नववी, दहावीचे विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत होते. पण वादळी पावसामुळे रात्रीच्या वेळेस शाळाच भुईसपाट झाली, त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे पावसाचाही जोर जास्त होता. शाळेची महत्त्वाची कागदपत्रे विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, वह्या ,पुस्तके, प्रकल्प पाण्याने भिजल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक बांधवांनी हळहळ व्यक्त केली. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वर्ग खोल्या नाहीत. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने, प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना वर्ग भरविण्यासाठी मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
Web Title: stormy rain, school floor, inconvenience to students