अहमदनगर: जावयाने सासूच्या डोक्यात घातला दगड अन संपविले
Ahmednagar News: पत्नीला माहेरी घरात गुपचूप झोपवल्याचा राग आल्याने जावयाने ८५ वर्षीय सासूच्या डोक्यात दगड घालून खून (murder) केल्याची घटना.
पारनेर: पत्नीला माहेरी घरात गुपचूप झोपवल्याचा राग आल्याने जावयाने ८५ वर्षीय सासूच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील चोंभूत, चोरमले वस्ती येथे रविवारी (दि.१७) दुपारी घडली.
संतोष दौलत शेंडगे (५५, रा. शिरसुले, निघोज, ता. पारनेर) असे संशयित जावयाचे नाव आहे. त्यावर पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेत राधाबाई महादू चोरमले (८५, रा. चोरमले वस्ती, चोंभूत, ता. पारनेर) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
पारेनर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी संशयित संतोष शेंडगे यांने त्याची पत्नी भानुबाई यांना डोक्यात दगड घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. ही बाब त्यांनी मयत आई राधाबाई यांना सांगितल्यानंतर त्यांनी यामुळे धोका पत्करायला नको म्हणून भानुबाईला माहेरी बोलावून तीला त्यांच्यासोबत घरात झोपवले होते. याचा राग डोक्यात असल्याने संतोष शेंडगे याने दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी राधाबाई या एकट्याच आपल्या घरात झोपल्या असता तेथे आलेल्या संतोष शेंडगे याने मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालून त्यांना ठार केले व तेथून पोबारा केला. याप्रकरणी पारनेर पोलिसांत शेंडगे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक उगले करत आहेत.
Web Title: son-in-law threw the stone on his mother-in-law’s head murder
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App