दहा लाख पळवणाऱ्यास कर्जतमध्ये शस्त्रांसह अटक
Ahmednagar: अन्य एक आरोपी यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात (Arrested).
कर्जत : कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बँकेतून काढलेली दहा लाखांची रोकड पळवणाऱ्या एका आरोपीस शस्त्रांसह आज अटक करण्यात आली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर घटनेतील एका आरोपीस यापूर्वीच अटक केली होती. परंतु या प्रकारातील दूसरा आरोपी सोमनाथ विठ्ठल साळुंखे (वय २७) हा तेव्हापासून फरार होता त्यास आज गजाआड करण्यात आज कर्जत पोलिसांना यश आले आहे. याबाबत पियुष रवींद्र कोठारी (रा. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मालाचे पैसे देण्यासाठी दहा लाखांची रोकड घेऊन दुचाकीवरून येत होते. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ विठ्ठल साळुंखे (वय २७), प्रमोद विजय आतार (वय १९ दोघेही रा. कोरेगाव ता. कर्जत) यांनी फिर्यादी पियुष कोठारी यांच्या दुचाकीवर असलेली बॅग हिसकावून पळवून नेली होती. कर्जत पोलीस फरार आरोपीच्या मागावर होते. फरार आरोपी हा कर्जत तालुक्यात रात्री उशिरा दाखल झाला असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून कर्जत पोलिसांनी तत्काळ कारवाई करून या आरोपीस अटक करत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.
आरोपीस चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे अनंत सालगुडे पोलीस जवान शाहूराज तिकटे उद्धव दिंडे सलीम शेख प्रवीण अंधारे यांनी ही कामगिरी केली आहे.
Web Title: smuggler arrested with weapons in Karjat